|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शॉवर खाली हळदी खेळणे बेतले जीवावर

शॉवर खाली हळदी खेळणे बेतले जीवावर 

महाविद्यालयीन तरूणाचा मृत्यू

प्रतिनिधी/ कोल्हापूर

    विवाह कार्यात पाण्याचा शॉवर जोडुन त्या खाली हळद खेळण्याचे प्रस्थ सध्या वाढत आहे. मात्र अशा प्रकारे हळद खेळणे जीवावर बेतू शकते याचा प्रत्यय शुक्रवारी रात्री पांचगांव पसिरात एका विवाह सोहळ्यात आला. हळद खेळत असताना मोटारीचा विद्युत धक्का बसून महाविद्यालयीन तरूणाचा मृत्यू झाल्याची हदयद्रावक घटना शुक्रवारी रात्री घडली. राम रणजीत खारकर (वय 21) असे मृतांचे नांव आहे. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली.

   याबाबत अधिक माहिती अशी की, राम खारकर हा पांचगाव येथील एका नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी आले होते. शुक्रवारी रात्री राम खारकर नातेवाईकांसोबत हळद खेळत होता. यावेळी दारामध्ये तयार करण्यात आलेल्या मांडवामध्ये हळद खेळण्यासाठी पाण्याचा शॉवर जोडण्यात आला होता. पाण्याच्या टाकीची मोटर टँकरवर जोडण्यात आली होती. राम खारकर हळद खेळत असताना टँकरजवळ गेला. मोटारातील विद्युत प्रवाह टँकरमध्ये उतरला. याची धक्का बसून राम खारकर काही अंतरावर उडून पडला. नातेवाईकांनी त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. या घटनेमुळे लग्नसमारंभाचे आनंदी वातावरण अवघ्या काही वेळातच दुखःमध्ये बदलून गेले.