|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बार्शी तालुक्यात मोरासह अकरा पक्षी मृत आढळले

बार्शी तालुक्यात मोरासह अकरा पक्षी मृत आढळले 

प्रतिनिधी/ बार्शी

बार्शी तालुक्यातील मालेगाव येथे पाटीलवस्ती व घोडकेवस्तीजवळ असणाऱया टेकडीवर राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांसह अकरापक्षी मृत होऊन कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. विषबाधा झाल्यामुळे पक्षांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱयांनी व्यक्त केला. तीस ते 40 पक्षी मृत झाले असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये असून शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

मालेगाव येथे भौगोलिक पर्यावरण वातावरण पक्षांसाठी पोषक असल्याने या परिसरात मोरांसह अन्य पक्षांची मोठय़ा प्रमाणात संख्या असून मागील तीन दिवसांपासून गावामध्ये पक्षी मृत अवस्थेत आढळत आहेत अशी चर्चा सुरू झाली. घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. सातपूते यांना देण्यात येत्याच पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता राष्ट्रीय पक्षी मोर-3, लांडोर-3, तीतर-1, भारद्वाज-1, होला-1, लोहार-1, सातभाई-1, असे 11 पक्षी मृत होऊन कुजलेल्या अवस्थेत असल्याचे दिसले.

पशुवैद्यकीय अधिकारी वैराग यांनी लोहार या पक्षाचे शवविच्छेदन केले असून विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. नेमका कशामुळे मृत्यू झाला याबाबत पुणे येथील प्रयोगशाळेत नमुने पाठवले असून नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगितले. या भागामध्ये पक्षांची मोठय़ा प्रमाणात शिकार करण्यात येत असून शिकारी ज्वारी व मका या पिकांवर गुंगीचे औषध टाकून पक्षी बेशुद्ध होताच त्यांची शिकार करतात. गुंगीच्या औषधाची मात्रा जास्त झाल्याने पक्षी मृत झाले असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती.

एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पक्षी मारणे ही घटना दुर्देवी असून सध्या मोरांचा प्रजनन कालावधी सुरू आहे. या घटनेने तेथील पर्यावरणावर तसेच निसर्गावर देखील परिणाम होऊ शकतो. मोरांचे मृतदेह घेऊन गेले असे समजले असून जखमी मोर उचलून नेताना अनेक ग्रामस्थांनी पाहिले असल्याची माहिती पक्षीमित्र तसेच नेजर कॉन्झर्वेशन सर्कल चे सदस्य प्रतिक तलवाड यांनी सांगितले.

वन्य पशुपक्षी याबाबत माहिती घेणे सुरू असून राष्ट्रीय पक्षी मोर यांसह इतर 11 पक्षी मृत अवस्थेत आढळून आले. कुजलेल्या अवस्थेत पंचनामा केला असून वनविभागाच्यावतीने अज्ञान इसमांवर गुन्हा दाखल केलेला आहे. याबाबत पंचनाम्याची प्रत असून दोन दिवस वनविभागाचे पथक वनक्षेत्राची पाहणी करेल तर कोणी हा प्रकार केला याचा शोध घेईल, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एम.सातपूते यांनी दिली. तालुक्यात या घटनेमुळे खळबळ उडाली असून पशु-पक्ष्यांची शिकार करणाऱयांना शिक्षा झालीच पाहिजे अशी चर्चा शहरात सुरू आहे.