|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जिह्यात पेयजलसाठी 466 कोटी मंजूर

जिह्यात पेयजलसाठी 466 कोटी मंजूर 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

सांगली जिह्याला राष्ट्रीय पेयजल व मुख्यमंत्री पेयजल योजनेतंर्गत 226 पेयजल योजना मंजूर झाल्या आहेत. यासाठी 466 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हातकणंगले मतदार संघात 176 पाणी पुरवठा योजना मंजूर असून त्यासाठी 225 कोटी रुपये निधी उपलब्ध होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी स्वतःची टिमकी बडवून घेत आहेत. त्यांना अजूनही आपलं सरकार नसल्याचे उमगतच नाही, असा टोला कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार बैठकीत लगावला.

खोत म्हणाले, एक वर्षापूर्वी हे पाणीपुरवठा खाते माझ्याकडे आले आहे. त्यामुळे इतका मोठा निधी मी जिह्याला देऊ शकलो. वाळवा तालुक्यात सर्वात मोठी पेयजल योजना पेठ गावात होणार आहे, यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. गेल्या 15 वर्षात इतका मोठा निधी कधी आला नव्हता. हातकणंगले मतदार संघात मंजूर केलेल्या योजना कंसात निधी हातकणंगले- 21 योजना (30 कोटी), शाहूवाडी तालुका’- 42 योजना (16 कोटी), पन्हाळा-52(30कोटी), शिराळा- 23 (20कोटी), वाळवा-पहिल्या 10 योजना दिल्या होत्या. आता 33 योजना मंजूर झाल्या आहेत. त्यासाठी 65 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. तसेच नेर्ले व कासेगावला पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. त्यासाठी कासेगावला 5 कोटी 75 लाख रुपये दिले आहेत. पण काही मंडळी या योजना आम्ही मंजूर केल्या, असा प्रचार करत आहेत. या योजनेच्या मंजुरी देण्याचे काम उमा भारती यांनी यांनी केले. यासाठी दिल्लीमध्ये बैठक झाली होती. या योजनेतंर्गत राज्याला एक हजार कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. व राज्यातील सहाहजार पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. मार्चपर्यंत 2 हजार कोटी रुपये मिळणार आहेत.

सांगली जिह्याला आणखी निधी खेचून आणण्याची आमची तयारी आहे. मला पाणी पुरवठा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे ही कामे मी करु शकलो. जेवढया योजना होत्या. तेवढय़ा त्यांना मंजूरी मिळवून देण्याचे काम केले आहे. शाहूवाडीसारख्या डोंगराळ भागात 31 योजना, पन्हाळा 43 योजना मंजूर झाल्या आहेत. या भागातील गावे पाण्यापासून वंचित होती. त्या गावांना या माध्यमातून पाणी मिळणार आहे. पन्हाळा गडावर पाणी टंचाई तिव्रतेने भासत होती. यासाठी पाच कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. तसेच पडवळवाडी, शेखरवाडी, लोणारवाडी या छोटया-छोटया गावांना 40 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

 या अगोदरच्या सरकारच्या काळात तुजारपूरच्या योजनेत भ्रष्टाचार झाला होता. त्यांनी क्षारयुक्त पाणी नागरिकांना आजपर्यंत दिले. यामुळे नागरिक आजारी पडले. पण, मी या गावांना आणखी पैसे लागले तर देण्याची तयारी आहे. साखराळे गावामध्ये पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. पण विरोधकांनी उद्घाटनाचा घाट घातला आहे. ही योजना मी मंजूर केली आहे. तेथील वसाहतीला 75 लाख रुपयाचा निधी दिला आहे. ऐतवडे खुर्द वसाहतींना पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. शिरगावात ग्रामस्थांची पुलाची मागणी आहे. तेथील रस्त्याचा दर्जा बदलला की पुलाला प्रस्ताव देऊन मंजुरीचे आदेश लवकरात लवकर मिळवू, असे यावेळी त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सच्चा माणूस

सांगली, कुपवाड, मिरज महानगरपालिकेत भाजपा विजयाचा आनंद साखर वाटप करुन साजरा करण्यात आला. तसेच सांगलीकरांचे ऋण व्यक्त करताना  खोत म्हणाले, या निवडणुकीत सिध्द झाले आहे की, मुख्यमंत्री सच्चा माणूस आहे. आमचा फडणवीस सरकारवर विश्वास असल्याची मोहोर मतदारांनी मतदानातून उठवली आहे. फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांनी शाळा, कारखाने, ट्रस्ट, संस्था उभ्या केल्या नाहीत. तर ऊस उत्पादक शेतकऱयाला न्याय मिळवून दिला. साखरेला भाव ठरवून दिले. शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल केला. शिक्षण सम्राटांची मक्तेदारी मोडीत काढली. जलयुक्त शिवार योजना राबवली. आणि पूर्ण महाराष्ट्रभर रस्त्याचे जाळे विणले आहे. तसेच अपुऱया सिंचन योजना जोमाने सुरु केल्या आहेत.

मराठा समाजाला झुलवले

यावेळी खोत म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काम सुरु आहे. त्यामुळे मराठा तरुणांनी आत्महत्या करु नयेत. वंचितांच्या पाठीशी भाजपा सरकार ठामपणे उभा आहे. राष्ट्रवादी व काँगेस सध्या राजकीय पोळी भाजून घेत आहेत. मागच्या सरकारमध्ये मुठभर मराठय़ांच्या हातात सत्ता होती. त्यांनी मराठा समजाला न्याय †िदला नाही. त्यावेळी शालिनीताईंनी आरक्षणाची मागणी केली. पण, त्यांनाही राष्ट्रवादीतून हाकलले. मराठा समाजाला गरीब ठेवण्याचे काम त्यांनी केले. कारखाना, संस्था, ट्रस्टच्या जाळय़ात अडकून ठेवले. त्यांची कोंडी करुन सत्ता भोगली. सत्ता भोगून त्यांना विट आला आहे.