|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कब्बूर नगरपंचायतीच्या निवडणुकीला ग्रहण

कब्बूर नगरपंचायतीच्या निवडणुकीला ग्रहण 

प्रतिनिधी/   चिकोडी

निवडणूक आयोगाने नुकतेच 2 ऑगस्ट रोजी राज्यातील 105 नगरपालिकांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पण चिकोडी तालुक्यातील कब्बूर नगरपंचायतीच्या निवडणुकीला ग्रहण लागले आहे. नगरपंचायत रचनेवरून निर्माण झालेला गोंधळ व सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कब्बूरवासीय या निवडणुकांना मुकणार आहेत. याशिवाय नगरपंचायतीचा पहिला नगरसेवक म्हणून मिरवू इच्छिणाऱयांची चांगलीच गोची झाली आहे.

कब्बूर (ता. चिकोडी) ग्रामपंचायत व्याप्तीत येणाऱया काही गावांना जोडून 2015 मध्ये कब्बूर ग्रामपंचायतीस नगरपंचायतीचा दर्जा दिला होता. यासाठी 2015 मध्येच सरकारने आदेशही काढला होता. पण या नगरपंचायतीस जोडलेल्या मिरापुरहट्टी या गावच्या ग्रामस्थांनी कब्बूर नगरपंचायतीस आपले गाव न जोडता स्वतंत्र ग्राम पंचायतीचा दर्जा द्यावा, यासाठी सरकारला निवेदन दिले होते.

पण सरकारने त्याची दखल न घेता या गावास कब्बूर नगरपंचायतीस जोडले. त्यामुळे या गावच्या ग्रामस्थांनी न्यायालयात धाव घेऊन 2016 मध्ये मे महिन्यात झालेल्या कब्बूर नगरपंचायतीच्या निवडणुकीस बंदी आणली. परिणामी सरकारने अजूनही यावर कोणतीच पाऊले उचलले नसल्याने यावेळीही कब्बूर नगरपंचायतीच्या निवडणुकीस मुकावे लागणार आहे.

दर्जा मिळून देखील विकास नाही

कब्बूरला नगरपंचायत होऊन तीन वर्षे झाली आहेत. पण न्यायालयीन प्रकरणामुळे येथे लोकप्रतिनिधींची निवड न झाल्याने वाढीव निधी असूनही लोकांना विकासापासून वंचित रहावे लागत आहे. कब्बूर ग्रामपंचायतीस नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर प्रशासनासाठी या नगरपंचायतीच्या प्रशासकपदाचा अतिरिक्त कार्यभार चिकोडीच्या तहसीलदारांना दिला आहे. केवळ एका मुख्याधिकाऱयांची  नेमणूक केली आहे. त्यामुळे अनुदान मिळत आहे. पण त्याचा योग्यरित्या वापर होत नाही अशी टीका नागरिक करत आहेत.

काही कर्मचाऱयांना अतिरिक्त पदभार

कब्बूर नगरपंचायतीचे कामकाज ग्रामपंचयतीच्या कार्यालयातूनच चालत असून जिल्हा पंचायतीकडून अनुमोदन घेतलेल्या कर्मचाऱयांनाच येथे नेमण्यात आले आहे. नव्या कोणत्याही कर्मचाऱयांच्या नेमणुका करण्यात आल्या नाहीत. काही कर्मचाऱयांच्या कंत्राटी पद्धतीद्वारे नेमणुका करण्यात आल्या आहेत. तर इतर कर्मचारी हे स्थानिक संस्थांचे कर्मचारी असून त्यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सर्वांची पाठ

कब्बूर नगरपंचायतीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर सरकारने कोणतेच पाऊल उचलले नाही. शिवाय लोकांची मागणी असून देखील संबंधित आमदार, खासदार, विधान परिषद सदस्य, राज्यसभा सदस्य आदीसह कोणत्याच राजकीय नेत्यांनी या समस्येविषयी चकार शब्द देखील काढला नाही. त्यामुळे सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना सरकारचे अधिकारीच राबवत आहेत. स्थानिकांना अनेक सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. स्थानिक समस्यांचा पाठपुरवठा करण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी स्थानिक नेत्यांचे पात्र महत्त्वाचे असते. पण इच्छा असून देखील प्रकरण न्यायालयात गेल्याने अनेकांना या समस्येकडे पाठ फिरवावी लागत आहे.