|Monday, July 22, 2019
You are here: Home » क्रिडा » विराट टेस्टमध्ये बेस्ट! क्रमवारीत नं.1

विराट टेस्टमध्ये बेस्ट! क्रमवारीत नं.1 

क्रमवारीत अग्रस्थान मिळवणारा भारताचा सातवा खेळाडू, ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथला टाकले मागे

वृत्तसंस्था/ दुबई

इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत भारताला जरी निसटता पराभव स्वीकारावा लागला असला तरी भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी मात्र ही कसोटी चांगलीच फलदायी ठरली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथला मागे टाकत अग्रस्थानावर कब्जा केला आहे. कसोटी फलंदाजाच्या क्रमवारीत अव्वलस्थान पटकावणारा विराट हा भारताचा केवळ सातवा फलंदाज आहे.

इंग्लंडविरुद्ध कसोटीत पहिल्या डावात विराटने कारकिर्दीतील 22 वे शतक झळकावताना 149 धावा कुटल्या. याशिवाय, दुसऱया डावातही 51 धावांची झुंजार खेळी साकारली. या कामगिरीच्या जोरावरच्या त्याने 934 गुणासह अग्रस्थान पटकावले. स्मिथला मागे टाकून कसोटी क्रमवारीत अग्रस्थान मिळवणारा विराट कोहली हा 2011 नंतरचा पहिला भारतीय फलंदाज आहे. त्याआधी 2011 मध्ये सचिन तेंडुलकर कसोटी क्रमवारीत अग्रस्थानी होता. याशिवाय, विराटपूर्वी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, सुनील गावसकर व दिलीप वेंगसरकर यांनाच अव्वलस्थान पटकावण्याची किमया साधता आली आहे.

दोन वर्षानंतर स्टीव स्मिथ अग्रस्थानावरुन पायउतार

भारतीय कर्णधार विराटच्या दमदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथला कसोटी क्रमवारीतील अग्रस्थानावरुन पायउतार व्हावे लागले आहे. ताज्या क्रमवारीत स्मिथ 929 गुणासह दुसऱया स्थानावर आहे. 2015 पासून स्मिथ अग्रस्थानी होता मात्र बॉल टेम्परिंगप्रकरणी शिक्षा झाल्यामुळे स्मिथ सध्या कसोटीपासून दूर आहे. तसेच इंग्लंडचा ज्यो रुट तिसऱया, न्यूझीलंडचा केन विल्यम्सन चौथ्या व डेव्हिड वॉर्नर पाचव्या स्थानी आहे. भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा सहाव्या तर लोकेश राहुल 19 व्या स्थानावर आहे.

गोलंदाजी क्रमवारीत इंग्लंडचा जेम्स अँडरसन पहिल्या स्थानावर असून द.आफ्रिकेचा कॅगिसो रबाडा दुसऱया, भारताचा रविंद्र जडेजा तिसऱया, आफ्रिकेचा फिलँडर चौथ्या तर भारताचा आर.अश्विन पाचव्या स्थानी आहे.