|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » केसरकर-राणे एकाच व्यासपीठावर

केसरकर-राणे एकाच व्यासपीठावर 

सिंधु एक्स्पो प्रदर्शन : राजकीय भाष्य टाळले : हस्तांदोलन करून निरोप

प्रतिनिधी / कुडाळ:

राजकारण म्हटलं म्हणजे राजकारणातले हेवेदावे, सत्ताधारी-विरोधक हे सगळं आलं. आरोप-प्रत्यारोप ठरलेले असतात. सिंधुदुर्गात केसरकर-राणे यांचा राजकीय पटलावरील विरोध सर्वांना माहीत आहे. सोमवारी हे दोघे अचानक एका व्यासपीठावर आले तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या. आता कोण काय बोलणार, याची उपस्थितांमध्ये कुजबूज सुरू झाली. हे दोघे व्यासपीठावर येताच थोडावेळ उत्सुकता ताणली जाते. अचानक हे दोघे एकमेकांना ‘आदरणीय साहेब’ असा उल्लेख करून स्वागत करतात. तेव्हा उपस्थितही अचंबित होतात. सिंधु एज्युकेशन एक्स्पोचे व्यासपीठ या भेटीला निमित्त ठरले.

जि. प. सिंधुदुर्ग, शिक्षण विभागाने विद्यार्थी-पालक-शिक्षणप्रेमी यांच्यासाठी विविध शैक्षणिक दालनांची माहिती व्हावी, यासाठी येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे ‘सिंधु एज्युकेशन एक्स्पो 2018’ या शैक्षणिक प्रदर्शन व मार्गदर्शन देणाऱया शिबिराचे आयोजन केले होते. तीन दिवसांच्या या शिबिराचा सोमवारी शेवटचा दिवस. सकाळी 10.30 वाजण्याच्या दरम्यान पालकमंत्री दीपक केसरकर प्रदर्शनाला भेट देणार आहेत, त्याच दरम्यान माजी खासदार नीलेश राणे हेसुद्धा भेट देणार आहेत, अशी चर्चा होती. त्यामुळे उपस्थित सर्वांचे लक्ष याकडे लागले होते.

राणे 11.45 वाजण्याच्या सुमारास आले. त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्षी यांनी स्वागत केले. उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी राणे उभे राहिले. काही वेळाने दीपक केसरकर समारंभाच्या ठिकाणी आले. ‘आदरणीय पालकमंत्री दीपक केसरकर साहेब’ असा त्यांचा उल्लेख करून त्यांनी त्यांचे स्वागत केले. केसरकर यांनीही त्यांना हात उंचावून प्रतिसाद दिला. ते व्यासपीठावर गेल्यानंतर त्यांचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी स्वागत केले.

हस्तांदोलन करून निरोप

व्यासपीठावरून या दोन नेत्यांनी निरोप घेताना हस्तांदोलन केले. त्यानंतर ऍड. अजित भणगे मार्गदर्शन करताना सुरुवातीसच म्हणाले, राजकीय विरोधक दोन दिग्गज नेते एकत्र आले. त्यांनी राजकीय भाष्य केले नाही, हीच आपली संस्कृती आहे. डॉ. प्रसाद देवधर यांनी आजची शिक्षण पद्धती आपण आत्मसात कशी करावी, याची माहिती दिली. व्यासपीठावर जि. प. अध्यक्ष रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, जि. प. माजी अध्यक्ष सतीश सावंत, जि. प. शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ, कुडाळ पं. स. सभापती राजन जाधव, डॉ. जी. टी. राणे व अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती.

Related posts: