|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » नियतीचा दुर्दैवाचा फेरा, शासन दरबारीही नाही थारा!

नियतीचा दुर्दैवाचा फेरा, शासन दरबारीही नाही थारा! 

प्रथम दृष्टी, त्यानंतर नियतीने घरही हिरावले

माळवशी येथील करंडे कुटूबांच्या जीवनात अंधार, घरकुल मिळेना, रेशनकार्डही रद्द

दीपक कुवळेकर /देवरुख

दोन्ही भाऊ अंध … दोघांच्या पत्नीही दृष्टीहीन …. तरीही नियतीने पदरात टाकलेले दान स्विकारून लहान-मोठी कामे करत हे कुटुंब नेटाने आपला संसारगाडा हाकण्याचा प्रयत्न करत आहे. यातच दोन वर्षापूर्वी त्यांचे राहते घर…. जगण्याचा एकमेव आधारही कोसळला… नियती जणू त्यांच्या जिद्दीची आणि संयमाची परीक्षाच पाहात होती. नियतीच्या या फेऱयांपेक्षा घरकुल मिळावे म्हणून शासन, सामाजिक कार्यकर्ते व पुढारी यांचे उंबरठे झिजवण्यासाठी माराव्या लागणाऱया फेऱया मात्र त्यांच्या जिव्हारी लागत आहेत. अंगावर शहारा आणणारी ही स्थिती आहे संगमेश्वर तालुक्यातील माळवशी येथील अंकुश आणि अनंत करंडे यांची.

दैवाने जे नाकारले त्यावर कर्माने मात करण्याचा या कुटुंबाचा ‘डोळस’ प्रयत्न खरेतर अनेकांना प्रेरणादायी, अनुकरणीय. मात्र शासन-प्रशासनाकडून त्यांना मिळणारी वागणूक संवेदनशीलता हरवलेल्या… खऱया अर्थाने दृष्टीहीन झालेल्या व्यवस्थेचेच लक्षण मानावे लागेल. त्यातच हे कुटुंब मुंबईत असल्याचे दाखवत त्यांचे रेशनकार्डही रद्द करून शासनाने आपल्या ‘तत्परतेचा’ अजब नमुनाच सादर केला आहे.

वयाच्या बाराव्या वर्षी अंकुश तर तेराव्या वर्षी अनंतची दृष्टी गेली. हसत्या-खेळत्या कुटुंबावर खरोखरचा ‘अंधार’ पसरला. छोटी मोठी कामे करत त्यांनी ‘जगणे’ सुरुच ठेवले. यथावकाश त्यांचे लग्नही झाले. त्यांच्या सहचारिणी बनलेल्या दोघीही त्यांच्याप्रमाणेच दृष्टीहीन. या दृष्टीहीन कुटुंबाने एकमेकाला आधाराची दृष्टी देत जीवनरथाचे मार्गक्रमण सुरुच ठेवले. मुलांच्या माध्यमातून आशेचे किरण त्यांच्या जीवनात अवतरले. या दोघांना मुलेही झाली. सुदैवाने या मुलांना दृष्टी असल्याने या चौघांना त्यांचा आधार झाला. अनंत याला एक मुलगा व एक मुलगी तर अंकुश याला एक मुलगा आहे. हा आनंद अनुभवत असतानाच नियतीने त्यांच्यावर आणखी एक घाला घातला. दोन वर्षापुर्वी त्यांचे राहते घरही कोसळले.

गावातील घराचे व मुलांच्या उत्तम भवितव्याचे स्वप्न पाहत मुंबईमध्ये हे भाऊ रेल्वेत खेळणी व इतर वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करत आहेत. माळवाशी येथे त्यांचे राहते घर दोन वर्षापुर्वी जमिनदोस्त झाले. यानंतर घरकुल मिळावे यासाठी त्यांची भटकंती सुरु झाली. शासनदरबारी तसेच सामाजिक कार्यकर्ते, पुढारी यांचे उंबरठे झिजवले. मात्र त्यांच्या पदरी अद्याप निराशाच आहे. वास्तविक हे कुटूंब दारिद्रय़ रेषेखाली आहेच, त्याशिवाय दृष्टीहिन असल्यामुळे दिव्यांगही आहे. यामुळे या कुटूंबाला प्राधान्याने घरकुल देणे गरजेचे होते. असे असताना शासनाने मात्र दुर्लक्ष केले आहे.

रेशनकार्डही रद्द

सध्या हे कुटूंब मुंबईत एका झोपडपट्टीत राहत आहे. हे कुटूंब मुंबईत राहत असल्याने त्यांचे माळवाशी येथील रेशनकार्डही बंद करण्यात आले आहे. या कुटूंबाच्या म्हणण्यानुसार गावाला आल्यानंतर आपण धान्य घेत होतो, तरीही रेशन कार्ड बंद का केले हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करत आहे. अनेक ठिकाणी बोगस लाभार्थी खुलेआम रेशन घेत असता खऱया गरजवंतांकडे दुर्लक्ष करण्याच्या या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. शासनाबरोबरच दानशूर व्यक्तींनीही या कुटूंबांना मदत करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

चार वर्षाचा श्रेयश बनला त्यांची ‘दृष्टी’

अनंत व अंकुश या दोघांची मुले दृष्टी असल्याने तीच आता त्यांचा आधार बनली आहेत. आहे. सध्या अंकुशचा श्रेयश हा चार वर्षाचा मुलगा या कुटूंबाची ‘दृष्टी’ बनला आहे. सोमवारी हे कुटूंब देवरुख येथे आले होते. यावेळी हा छोटा चार वर्षाचा मुलगा त्यांना रस्ता दाखविण्याचे काम करत होता. अगदी गाडीत कसे चढायचे हे सुध्दा तो दाखवत होता. हे द्या पाहताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.