|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रिफायनरी प्रकल्पामुळे ‘चिपळूण-कराड’ गॅसवर?

रिफायनरी प्रकल्पामुळे ‘चिपळूण-कराड’ गॅसवर? 

वैभववाडी-कोल्हापूर नव्या मार्गाचे नशीब फळफळले,

सद्यस्थितीत एकाचवेळी दोन मार्ग पश्चिम महाराष्ट्राला जोडणे अशक्य

राजेंद्र शिंदे /चिपळूण

कोकण-पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱया चिपळूण-कराड रेल्वेमार्गाला सर्वात प्रथम मंजुरी आणि अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद होऊनही त्यानंतर मंजुरी मिळालेल्या वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे प्रकल्प मात्र पुढे सरकला आहे. बहुचर्चित रिफायनरी प्रकल्पामुळे या नव्या रेल्वे मार्गाचे नशीब फळफळले असल्याचे समोर येत आहे. सद्यस्थितीत एकाचवेळी दोन मार्ग पश्चिम महाराष्ट्राला जोडणे आर्थिकदृष्टी आव्हानात्मक असल्याने चिपळूण-कराड रेल्वेमार्गाचे भवितव्य धोक्यात आले आहे.

केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथे झालेल्या कोकण रेल्वेच्या आढावा बैठकीत नियोजित वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजुरी देत लवकरच या मार्गाचे काम सुरू करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे रखडलेल्या चिपळूण-कराड रेल्वे मार्गाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

यावर्षीच्या अर्थसंकल्पात चिपळूण-कराड या 112 कि. मी.च्या नव्या रेल्वेमार्गासाठी मंजूर 1200 कोटीपैकी 366 कोटीची आर्थिक तरतूद करण्यात आली होती. तर वैभववाडी-कोल्हापूर या 107 कि. मी.च्या नव्या रेल्वेमार्गाला काहीसे वेटींगवर ठेवण्यात आले होते. या मार्गासाठी मंजूर 2 हजार 770 कोटीपैकी अवघे दहा लाख देण्यात आल्याने चिपळूण-कराड रेल्वे प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येण्याच्या आशा निर्माण झाल्या होत्या. मात्र, त्यावर आता पाणी फिरले आहे.

कोकणात रस्ते, रेल्वेमार्गाचे जाळे निर्माण होत असताना जोडीला बंदरांच्या विकासावर भर आहे. जिह्यात चौगुले, जिंदाल, फिनोलेक्स, आरजीपीपीएल कंपनीची बंदरे आहेत. जहाज बांधणीसाठी लावगण डॉकयार्ड सुरू आहे. पायाभूत सुविधांसमवेत कोकणात आगामी काळात होणाऱया मोठय़ा गुंतवणुकीचा विचार केला तर नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी, मार्गताम्हाने एमआयडीसी, लोटे येथील औद्योगिक वसाहत, तिथेच होऊ घातलेला सुमारे 500 कोटींची गुंतवणूक असलेला कोका-कोलाचा प्रकल्प, रेल्वे कारखाना यामुळे या भागाचे चित्र चिपळूण-कराड नव्या रेल्वेमार्गामुळे पालटू शकणार आहे.

सुलभता, आवश्यता असूनही दुर्लक्षीत

कोकण रेल्वे कोल्हापूरला नेण्यासाठी प्रथम चिपळूण-कराड रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर पुढच्या रेल्वे अर्थसंकल्पात सावंतवाडीमार्गे कोल्हापूर आणि त्यानंतर राजापूरमार्गे कोल्हापूर मार्गाचे सर्वेक्षण करण्याची घोषणा झाली. मात्र या सर्वाकडे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने दुर्लक्ष केल्याने मार्च 2011मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड रेल्वेमार्गासाठी आग्रही भूमिका घेतली होती. चिपळूणमधून कराडमार्गे कोल्हापूरला एका तासात जाणे शक्य होईल. शिवाय मुंबई-पुणे मार्गावर कोणताही पेच उद्भवल्यास कोल्हापूर, चिपळूणमार्गे मुंबईला जाणे शक्य होईल. मुंबईतून येणाऱया गाडय़ा चिपळूणमार्गे कराड-कोल्हापूर व तेथून गोवा-मेंगलोरला नेता येतील असा जोरदार युक्तीवाद करत या मार्गाला प्राधान्य देण्यात आले होते. दळणवळणातील सुलभता आणि कोंडी टाळण्यासाठी हा मार्ग उपयुक्त ठरणारा असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यापूर्वी या मार्गासाठी शहानजी पालोनजी कंपनीबरोबरचा करारही संपुष्टात आलेला आहे.

रिफायनरीमुळे प्राधान्य

दरम्यान, रिफायनरी प्रकल्प डोळय़ासमोर ठेऊन वैभववाडी-कोल्हापूर मार्गाला प्राधान्य दिले जात असल्याचे पुढे येत आहे. नाणार येथील प्रस्तावित प्रकल्पाच्या कार्यासाठी हा मार्ग जवळचा ठरणारा असल्याने वैभववाडी-कोल्हापूर मार्गाचे नशीब उजळले आहे. वैभववाडीबरोबरच चिपळूण-कराड रेल्वेमार्गाला एकाचवेळी चालना मिळणे कठीण दिसत आहे. कोकणातील लोकप्रतिनिधीना याबाबत कोणतेच सोयरसुतक नसल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरच या मार्गाबाबत सर्वांची भिस्त आहे.