|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » क्रिडा » भारताचा बलाढय़ अर्जेन्टिनाला धक्का

भारताचा बलाढय़ अर्जेन्टिनाला धक्का 

धक्का यू-20 सीओटीआयएफ चषक फुटबॉल : सहावेळच्या वर्ल्ड चॅम्पियन्सवर 2-1 गोल्सनी मात

वृत्तसंस्था / व्हॅलेन्सिया, स्पेन

भारताच्या 20 वर्षांखालील युवा संघाने फुटबॉलमधील एक संस्मरणीय विजय मिळविला असून येथे सुरू असलेल्या  सीओटीआयएफ चषक स्पर्धेत दहा खेळाडूंनिशी खेळावे लागले असतानाही बलाढय़ अर्जेन्टिनाला 2-1 असा पराभवाचा धक्का दिला.

दीपक तांग्री (चौथे मिनिट) व अन्वर अली (68) हे भारतीय विजयाचे शिल्पकार ठरले. फ्लॉईड पिन्टो यांच्या मार्गदर्शनाखालील भारताच्या युवा संघाने सहा वेळा यू-20 वर्ल्ड चॅम्पियन्स स्पर्धा जिंकणाऱया अर्जेन्टिनावर विजय मिळवित ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. 2006 च्या विश्वचषकात खेळलेला लायोनेल स्कॅलोनी व माजी मिडफिल्डर पाब्लो ऐमर हे अर्जेन्टिना संघाचे प्रशिक्षक आहेत. भारतीय संघासाठी हा विजय संजीवनी देणारा असून याआधीच्या सामन्यात भारताला मुर्सियाकडून 0-2 आणि मॉरिटॅनियाकडून 0-3 असा पराभव स्वीकारावे लागले तर व्हेनेझुएलाने त्यांना गोलशून्य बरोबरीत रोखले होते.

‘फुटबॉल जगतात भारताचा आदर वाढविणारा हा विजय असून यापुढे जगातील सर्वोत्तम संघांविरुद्ध स्वतःला वारंवार आजमावून पाहण्याच्या संधीचे द्वार आमच्यासाठी खुले झाले आहे.,’ असे प्रशिक्षक पिन्टो म्हणाले. ‘अविश्वसनीय असा हा विजय असून आज मला भारतीय असण्याचा अभिमान वाटतो. एआयएफएफने युवा खेळाडूंना विकसित करण्याचे धोरण आखत जे प्रयत्न केले आणि त्यांच्यावर जो विश्वास दाखविला, त्याचेच हे फळ आहे. योग्य पाठिंबा आणि अनुभव घेण्याची संधी मिळाल्यास जगातील सर्वोत्तम संघांविरुद्ध आम्ही स्पर्धा करू शकतो, हा नवा विश्रास आमच्यात निर्माण झाला आहे,’ अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

चौथ्या मिनिटाला निथोइगान्बा मीतेईने घेतलेल्या कॉर्नरवर तांग्रीने हेडरद्वारा गोल नोंदवून भारताला आघाडी मिळवून दिली. या आघाडीने प्रेरित झालेल्या भारताने आपले आक्रमण आणखी तेज केले आणि पूर्वार्धात त्यांनी अनेक संधी निर्माण केल्या. सुरेश ंिसंग वांगजम व बोरिस सिंग थांगजम यांनी अनिकेत जाधवला चेंडू पुरविण्याचा प्रयत्न केला. पण दोनदा त्याला ऑफसाईड ठरविण्यात आले. मध्यंतराला भारताची एका गोलाची आघाडी कायम होती.

उत्तरार्धात अलीने एक सुंदर संधी गमविली. कर्णधार अमरजित सिंग कियामने त्याला पास पुरविला. पण त्याचा फटका अर्जेन्टाईन गोलरक्षकाने अचूक थोपविला. 54 व्या मिनिटाला भारताचा आघाडीवीर अनिकेत जाधवने फाऊल केल्याने पंचांनी रेड कार्ड दाखवून बाहेर घालविले. त्यामुळे भारताला उर्वरित वेळेत दहा खेळाडूंनिशी खेळावे लागले. अर्जेन्टिनानेही भारतावर आक्रमण केले. पण 56 व 61 व्या मिनिटाला भारतीय गोलरक्षक प्रभसुखान गिलने शानदार गोलरक्षण करीत त्यांचे प्रयत्न फोल ठरविले. 68 व्या मिनिटाला मिळालेल्या फ्रीकिकवर मात्र अन्वर अलीने शानदार गोल नोंदवत भारताची आघाडी 2-0 अशी केली. रहिम अलीवर फाऊल झाल्यानंतर भारताला ही फ्रीकिक मिळाली होती. चार मिनिटानंतर अर्जेन्टिनाला पहिले यश मिळाल्यानंतर भारताची आघाडी कमी झाली. मात्र उर्वरित वेळेत भारताने 2-1 ची आघाडी कायम राखत एक संस्मरणीय विजय नोंदवत स्पॅनिश भूमीवर नवा इतिहास घडविला.

विशेष बाब म्हणजे राष्ट्रीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईन यांनी भारतात झालेल्या यू-17 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या कामगिरीवर टीका केली होती आणि उगाचच त्याचा गवगवा केल्याचे म्हटले होते. याशिवाय भारतीय संघाला भारतीय ऑलिम्पिक संघटनेने नकार दिल्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांना सहभागी होण्याची परवानगीही नाकारली होती. त्यानंतर या संघाने हे यश मिळविले ते लक्षवेधी ठरले आहे.