|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘गोवा माईल्स’ टॅक्सी ऍपचा शुभारंभ

‘गोवा माईल्स’ टॅक्सी ऍपचा शुभारंभ 

प्रतिनिधी/ पणजी

‘गोवा माईल्स’ या गोव्याच्या पहिल्या मोबाईल ऍपवर आधारित डिजिटल टॅक्सी सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते काल सोमवारी पर्वरी येथील मंत्रालयात करण्यात आला. यावेळी पर्यटनमंत्री बाबू आजगावकर, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नीलेश काब्राल, मुख्यसचिव धर्मेंद्र शर्मा, पर्यटन सचिव शेख प्रतापसिंह, पर्यटन संचालक मिनिनो डिसोझा, पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

किफायतशीर दराने टॅक्सीसेवा : मुख्यमंत्री

या नवीन ऍपचा शुभारंभ केल्यानंतर पर्रीकर म्हणाले की, पर्यटकांना गोव्यात आल्यानंतर पुन्हा जाईपर्यंत या ऍपचा वापर करून टॅक्सीने फिरता येईल. टॅक्सीचालकांना त्यासाठी कोणतेही पैसे खर्च करावे लागणार नाहीत. सरकारने मान्यता दिलेल्या दरानुसार भाडे आकारण्यात येणार असून ते सर्व पर्यटक प्रवाशांकडून त्यांना मिळेल. या व्यवहारात टॅक्सीचालक, ग्राहक यांची कोणतीही फसवणूक होणार नाही. ही सेवा त्यांना हव्या त्या ठिकाणी उपलब्ध होईल. डिजिटल इंडियाचा एक भाग म्हणून ही ऍप आधारित सेवा सुरू करण्यात आल्याचे पर्रीकर म्हणाले.

तिनशे टॅक्सीचालक मालकांचा सहभाग : पर्यटनमंत्री

मंत्री आजगावकर यांनी या नवीन टॅक्सी सेवेचा शुभारंभाबद्दल आनंद प्रकट करून सांगितले की, पर्यटक व प्रवाशांना नवीन चांगला अनुभव मिळेल आणि भाडे आकारणी सोपी होणार आहे. या सेवेत गोव्यातील सुमारे 300 टक्सीचालक-मालक सहभागी झाले असून सर्वांनी या सेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन आजगावकर यांनी केले. गुगल प्ले स्टोअर्स किंवा ऍपल स्टोअरमधून ‘गोवा माईल्स’ हे ऍप डाऊनलोड करता येते, अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.

नीलेश काब्राल म्हणाले की, या मोबाईल ऍपची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पर्यटन विकास महामंडळाने केले असून त्याबाबत जनजागृती केली आहे. या ऍपच्या डिजिटल यंत्रणेत सर्व टॅक्सीचालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅक्सीचालकांचा व्यवसाय भरभराटीस येईल

या नवीन ऍप सेवेमुळे टॅक्सीचालक मालकांचा व्यवसाय भरभराटीस येईल  अशी आशा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वर्तविली. सदर सेवेत टॅक्सीचे पैसे डिजिटल पद्धतीने कॅशलेस स्वरूपात देण्याची सोय असून त्या उपक्रमास मोठे यश मिळेल, अशी सदिच्छाही त्यांनी प्रकट केली.