|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फॉर्मेलिन’मासळीचा विषय खंडपीठात

फॉर्मेलिन’मासळीचा विषय खंडपीठात 

सरकारी यंत्रणा गंभीर नसल्याचा आरोप

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यातील फॉर्मेलिनयुक्त मासळी विकली जात असल्याने मिरामार येथील शिवराज कामत तारकर या युवकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर जनहित याचिका सादर केली असून या याचिकेवर आज मंगळवारी सुनावणी होणार आहे.

गोव्यात फॉर्मेलिनयुक्त मासे सर्रासपणे विकले जातात, पण गोवा सरकारची अन्न व औषध प्रशासनालय (एफडीए) ही तपासणी यंत्रणा त्यावर कोणतीच कारवाई करीत नाही व उपाययोजनाही घेतली जात नाही, असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

दि. 12 जुलै 2018 रोजी अन्न आणि औषध प्रशासनालयाने मडगाव येथील घाऊक मासळी बाजारात मासळीचे काही नमुने घेतले होते. प्राथमिक चाचणीत त्यात ‘फॉमलडिहायड’ हे रसायन आढळले. पण लगेचच अधिकाऱयांनी आपले शब्द फिरवले आणि माशामध्ये जे रसायन सापडले त्याची मात्रा मान्यता प्राप्त असल्याचे म्हटले होते.

खंडपीठाने सरकारला जाब विचारावा

यावरुन वाद सुरु होताच माशांमध्ये नैसर्गिकरित्या फॅर्मेलिन असते असा शोध लावला गेला. त्यामुळे एफडीएच्या छाप्यात सापडलेले फॉर्मेलिन हे नैसर्गिक की रसायनिक ते जनतेला समजायला हवे. सरकारला लोकांच्या आरोग्याशी खेळता येणार नाही त्यामुळे या गंभीर प्रश्नावर सरकारने काय केले आहे त्याचा जाब सरकारला विचारावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

गोव्याबाहेरील मासळीची रोज तपासणी होते का?

गोव्याबाहेरुन येणाऱया मासळीत सदर रसायन आढळले नाही, तर मग 15 दिवसासाठी मासळी आयातीवर बंदी का घालण्यात आली. आता ती बंदी उठवण्यात आली आहे, तर मासळी रोज तपासली जात आहे का? याची विचारणा करणे आवश्यक असल्याचे याचिकादाराचे म्हणणे आहे.

मासळी व्यवसायावर सरकारी नियंत्रण नाही

गोमंतकीयाच्या जेवणात नित्याचे पदार्थ म्हणजे मासे. ते आता असुरक्षित वाटत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परराज्यातून जी मासळी येते त्याचा हिशेब ठेवला जात नाही. गोव्यात पकडली जाणारी मासळी गोव्यात अपुरी का पडते? ही मासळी निर्यात होते का? त्यामुळे परराज्यातील मासळी आणावी लागते असा प्रश्न करुन ज्या ठिकाणी पिकते तिथे विकले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.

पणजीत ज्या ठिकाणी मासळी वेगळी केली जायची ती जागा आता पार्किंगसाठी वापरण्यात आली आहे.

तक्रार केली तरीही चौकशी नाही

फुड सेफ्टी एन्ड स्टँडर्ड ऍक्टच्या कलम 3 (एल) (झेडझेड) व्ही प्रमाणे फॅर्मलडिहायड वापरणे गुन्हा आह.s दि. 19 जुलै 2018 रोजी एफडीए संचालक ज्योती सरदेसाई, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी चंद्रकांत कांबळी तसेच मासळीचा व्यापारी इब्राहिम मुल्ला व इतराविरुद्ध तक्रार दिली, पण या तक्रारीवर कोणतीच कारवाई झालेली नाही. या सर्वप्रकारावर खंडपीठाने न्यायालयीन चौकशी करावी व गुन्हेंगारांना शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

गोव्यातील मासळीचीच नव्हे तर फळे आणि भाज्यांचीही चाचणी व्हावी. गोव्यातील मासळी निर्यातीवर नियंत्रण असावे. साठा करण्यासाठी शीतगृहे बांधावित. नियमित तपासणी यंत्रणा व्यवस्था करण्यात यावी. तसेच एफ.डी.ए मधील अकार्यक्षम अधिकाऱयांवर कारवाई करावी, अशी याचना या याचिकेत करण्यात आली आहे.