|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सडुरे गावचा हिरा हरपला!

सडुरे गावचा हिरा हरपला! 

प्रतिनिधी / वैभववाडी:

जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे हे सिंधुदुर्गचे सुपुत्र. वैभववाडी तालुक्यातील सडुरे गावठण हे त्यांचे मूळ गाव. कौस्तुभ हे आई-वडिलांसह धार्मिक उत्सव, सणानिमित्त मूळ गावी येत असत. कौस्तुभ आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. पश्चात आई, वडिल, पत्नी व अडिच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.

मेजर कौस्तुभ यांना वीरमरण आल्याची माहिती वाऱयाच्या वेगाने सडुरे गावात धडकली आणि गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेने मेजर कौस्तुभ यांचे गावाकडील नातेवाईक हबकून गेले. सडुरे-गावठण येथे कौस्तुभ यांचे वडिलोपार्जीत घर आहे. त्यांचे आई-वडिल नोकरीनिमित्त 40 वर्षांपूर्वी मुंबई येथे स्थायिक झाले. गणपती उत्सव, धार्मिक उत्सव व कौटुंबिक कार्यक्रमांसाठी त्यांचे सडुरे गावी येणे- जाणे असायचे. मेजर कौस्तुभ यांचा जन्म मुंबई येथे झाला. एकुलते एक असलेले कौस्तुभ हे लहानपणी सडुरे येथे आई-वडिलांसोबत येत. कौस्तुभ हे सैन्याच्या 36 रायफल बटालियनमध्ये मेजर म्हणून कार्यरत होते. सैन्यात भरती झाल्यानंतर मात्र मेजर कौस्तुभ हे सडुरे येथे आले नाहीत. आचरा (ता. मालवण) येथील वडिलांच्या आजोळी त्यांच्या कुटुंबाचे जास्त येणे व्हायचे. मेजर कौस्तुभ यांच्या बलिदानाने सडुरे गावाचा हिरा हरपला आहे. त्यांचे नातेवाईक मुंबईकडे रवाना झाले आहेत.

सर्जिकल स्ट्राईकमध्येही होता सहभाग!

मेजर कौस्तुभ हे लहानपणापासूनच धाडसी होते. गतवर्षी भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्येही त्यांचा सहभाग होता, अशी माहिती कौस्तुभ यांचे चुलते व सडुरे गावचे माजी सरपंच विजय रावराणे यांनी दिली. कौस्तुभ यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा आम्हाला सार्थ अभिमान आहेच. मात्र, त्यांच्या निधनाचे दुःखही मोठे आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Related posts: