|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » हरिदासच्या घरी व्हीआयपी

हरिदासच्या घरी व्हीआयपी 

रिटायर झाल्यावर हरिदासने कविता लिहायला सुरुवात केली. त्या कविता काही संपादकांना पाठवल्या. संपादकांनी त्या परत केल्या किंवा केराच्या टोपलीत टाकल्या. मग हरिदासला फेसबुकचा शोध लागला. त्याने आपल्या कविता फेसबुकवर प्रसिद्ध केल्या. त्याने फेसबुकवर दिसणाऱया सर्व कविता लाईक केल्या आणि त्यांची कौतुके केली. मग त्या कवींनी त्याच्या कवितांचे कौतुक केले. मग हरिदास सोशल मीडियावरचा एक प्रसिद्ध कवी झाला.

आठ दिवसांपूर्वी त्याच्याकडे एक धिप्पाड पुढारी आले. पुढाऱयांच्या पाठोपाठ त्यांच्या खळ्खटय़ाक कार्यकर्त्यांची झुंड देखील होतीच. हरिदास आनंदाने मोहरला. त्याने पेपरात वाचले होते की अनेक राजकीय पक्षातले पुढारी हल्ली समाजातल्या कलाकार वगैरे व्हीआयपींकडे पायधूळ झाडून आपापल्या पक्षाला सांस्कृतिक चेहरा प्रदान करीत आहेत. आपण असे थोर कलाकार झालो या भावनेने त्याच्या अंगावर मूठभर मांस चढलं. त्यानं सर्वांचं स्वागत केलं. त्यांच्यासाठी बायकोला चहा ठेवण्यास फर्मावलं. मग हरिदास आणि पुढारी यांच्यात संवाद झडला.

“नमस्कार, ह्या ह्या ह्या.’’

“ह्या ह्या ह्या, नमस्कार.’’

“आज आमच्याकडं गरिबाकडे कसं काय येणं केलंत?’’

“गरीब नाय हो, तुम्ही मोठी माणसं, तुमच्याकडे नाही तर कुणाकडे येणार?’’

“इलेक्शनला उभे राहताय नं? कोणत्या चिन्हावर?’’

“चिन्ह आणि पार्टीला काय महत्त्व हो? तुम्ही सांगा. पार्टी काय, जिची हवा असेल ती पार्टी निवडू आपण. पार्टी बदलत राहते. आपली शीट धुवबाळासारखी फिक्स असतेय.’’

“होय, होय.’’

चहा झाला. सुपारी-बडीशेप झाली. पण लोकप्रतिनिधी काय जागचे हलेनात. हरिदास गोंधळला. त्याला वाटलं की बहुधा आपल्याला काहीतरी ऑफर मिळणार असेल. किंवा प्रचारासाठी आपल्या कविता वापरून आपल्याला मानधन देणार असतील. तेवढय़ात लोकप्रतिनिधीनी आपल्या चामडी बॅगेतून लांबोळके पुस्तक काढले. आता त्यातला चेक फाडून ते म्हणणार… “कविवर्य यंदा प्रचारात तुमच्याकडून काव्यमय घोषणा लिहून पाहिजेत. हा तुमच्या नावचा कोरा चेक. यावर सही करून देतो. तुम्हाला वाटेल तो आकडा लिहा.’’

हरिदासची तंद्री अचानक भंगली. लोकप्रतिनिधी विचारीत होते, “बोला कितीचा आकडा लिहू?’’

त्यांच्या हातात चेकबुक नव्हतं. त्यांच्या हातात मंडळाच्या सार्वजनिक उत्सवाचं पावतीपुस्तक होतं.