|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आस्था मर्गज, श्रीस्वरुप देसाई जिल्हय़ात प्रथम

आस्था मर्गज, श्रीस्वरुप देसाई जिल्हय़ात प्रथम 

शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत सिंधुदुर्गचे सातजण चमकले : पाचवीचा एक, आठवीचे सहा विद्यार्थी

प्रतिनिधी / सावंतवाडी:

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत 28 फेब्रुवारी 2018 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कुडाळ हायस्कूलची आस्था आनंद मर्गज हिने (91.26) टक्के गुणांसह जिल्हय़ात पहिला तर राज्य गुणवत्ता यादीत सहावा क्रमांक पटकाविला. तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कणकवली विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचा श्रीस्वरुप संतोष देसाई (92.61) याने जिल्हय़ात पहिला तर राज्य यादीत चौथा क्रमांक पटकाविला आहे. पाचवीचा एक, तर आठवीचे सहा विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले आहेत.

पूर्व माध्यमिकमध्ये कुडाळ हायस्कूलच्याच विराज गुरुराज कुलकर्णी (90.54) याने जिल्हय़ात दुसरा तर राज्यात सातवा आणि मालवण येथील रेकोबा माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी प्रवीण कुबल (88.51) हिने जिल्हय़ात तिसरा तर राज्य गुणवत्ता यादीत अकरावा क्रमांक मिळविला. त्याचबरोबर चिन्मय दत्ताराम दळवी (86.98), करुणा सदन इंग्लिश स्कूल, भेडशी-दोडामार्ग याला राज्य यादीत 15 वा तर स्वरुप जयराम धनावडे (83.78), सांगेली हायस्कूल, सावंतवाडी आणि मृण्मेश गोपाळ उपळेकर (83.78), कुडाळ हायस्कूल, कुडाळ यांना 22 वा क्रमांक मिळाला.

पूर्व उच्च प्राथमिक

पूर्व उच्च प्राथमिकच्या राज्य शहरी गुणवत्ता यादीत कणकवली विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या श्रीस्वरुप संतोष देसाई (92.61) याला चौथा तर जिल्हय़ात पहिला क्रमांक मिळाला आहे. वेदराज विठ्ठल गवस (86.57) जिल्हय़ात द्वितीय आणि पारस प्रसाद दळवी (85.90) याने तिसरा क्रमांक पटकाविला.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेला राज्यातून 4 लाख 72 हजार 610 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 1 लाख 8 हजार 560 विद्यार्थी पात्र ठरले. तर 16 हजार 593 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला 3 लाख 58 हजार 848 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 45 हजार 103 विद्यार्थी पात्र ठरले. तर 13 हजार 759 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. पात्र विद्यार्थी संख्येनुसार पूर्व प्राथमिकचा शेकडा निकाल 22.97 टक्के तर पूर्व माध्यमिकचा निकाल 12.57 टक्के लागला आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गुणपत्रक/प्रमाणपत्रांच्या छापील प्रती 27 ऑगस्टपर्यंत संबंधित जिल्हय़ाच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडे पोहोच करण्यात येणार आहेत. तर या प्रती शाळांना 1 सप्टेंबरपर्यंत मिळणार आहेत. तसेच गुणपत्रक/प्रमाणपत्राची डिजिटल प्रत संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये 14 ऑगस्टला उपलब्ध होणार आहे.

Related posts: