|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंबोलीच्या दरीत ट्रक कोसळून चालक अडकला

आंबोलीच्या दरीत ट्रक कोसळून चालक अडकला 

जखमी चालकाच्या बचावाचे प्रयत्न सुरू : चरामुळे घसरून ट्रक 500 फूट खाली

प्रतिनिधी / आंबोली:

आंबोली मुख्य धबधब्याच्या अलिकडे सावंतवाडीच्या बाजूने पाचशे मीटर अंतरावर बुधवारी एक ट्रक पाचशे फूट दरीत कोसळला. दरीत कोसळल्यानंतर त्याचे अनेक तुकडे झाले आहेत. ट्रकच्या तुकडय़ाखाली चालक अडकला असून तो बचावासाठी जोरजोराने ओरडत होता. त्याला काढण्यासाठी आंबोलीतील आपत्कालीन टीम दरीत उतरली होती. उशिरापर्यंत त्याला बाहेर काढण्याचे काम सुरू होते. सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. जिओ कंपनीने केबलसाठी रस्त्याकडेला चर खोदला होता. या चरात ट्रकचे चाक जाऊन तो दरीत कोसळल्याचे उघड झाले आहे.

गेळे येथे बुधवारीच सावंतवाडी पंचायत समितीची सभा झाली. या सभेत आंबोलीतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत सदस्यांनी सार्वजनिक बांधकामचे अधिकारी मुल्ला यांना धारेवर धरले होते. सभेनंतर अवघ्या काही तासातच हा अपघात घडल्याने सार्वजनिक बांधकामचे पितळ उघडे पडले आहे.

ट्रकचालक अडकला

ट्रक सावंतवाडीहून आंबोलीच्या दिशेने जात होता. घाटात मुख्य धबधब्याच्या अलिकडे एका वळणावर ट्रक पाचशे फूट दरीत कोसळला. त्यानंतर ट्रक दगडावर आदळून त्याचे तुकडे तुकडे झाले. ट्रकचा ड्रायव्हर तुकडय़ाखाली अडकला. तेथील ग्रामस्थांना अपघाताची माहिती समजल्यानंतर आंबोली आपत्कालीन टीमचे हेमंत नार्वेकर, अजित नार्वेकर, हवालदार गजानन देसाई सायंकाळी उशिरा दरीत उतरले. त्यावेळी ट्रकचालक ट्रकच्या एका मोठय़ा तुकडय़ाखाली सापडल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले. तो वाचविण्यासाठी जोरजोराने ओरडत होता. तो गंभीर जखमी झाल्याचे समोर आले. रात्री उशिरापर्यंत त्याला बाहेर काढण्याचे काम सुरू होते.

अपघाताची भीती कायम

आंबोली घाटात जिओ कंपनीने केबलसाठी चर खोदले होते. पावसामुळे हे चर तसेच राहिले. ट्रक वळणावर या चरात गेला. आणि घसरून दरीत कोसळला. आंबोली घाटात यंदा रिफ्लेक्टर बसविण्यात आलेले नाहीत. घाटात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र, रिफ्लेक्टर नसल्याने धुक्यात रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताची भीती कायम आहे. या पार्श्वभूमीवर हा अपघात झाल्याने बांधकाम विभाग रडारवर आला आहे.

Related posts: