|Sunday, August 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जिल्हा बंद नाही, फक्त ‘जेलभरो’

जिल्हा बंद नाही, फक्त ‘जेलभरो’ 

आजच्या आंदोलनाबाबत सकल मराठा समाजाने स्पष्ट केली भूमिका

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सकल मराठा समाजाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हय़ात 9 ऑगस्ट रोजी जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये असलेली संभ्रमावस्था दूर करण्यासाठी बुधवारी सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक डॉ. सुहास सावंत आणि या आंदोलनातील त्यांचे अन्य सहकारी यांच्याशी निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी सविस्तर चर्चा केली. 9 ऑगस्ट रोजी होणाऱया मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात पुकारण्यात आलेल्या जेलभरो आंदोलनाबाबत डॉ. सावंत यांनी सविस्तर माहिती दिली.

 डॉ. सावंत म्हणाले, 9 ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाच्यावतीने जेलभरो आंदोलन केले जाणार आहे. तथापि या आंदोलनामुळे जिल्हय़ातील सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, होऊ देणार नाही. त्यांनी या देखील बाबीचा पुनरुच्चार केला की, उद्याचे आंदोलन हे केवळ जेलभरो आंदोलन असून सकल मराठा समाज मोर्चाच्यावतीने कोणत्याही प्रकारे जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हय़ातील सर्व दुकाने, बाजार, वाहतूक सेवा या सुरळीत सुरू राहतील. या सेवा विस्कळीत होण्यासाठी कोणत्याही प्रकारे मराठा आंदोलकांकडून कार्यवाही केली जाणार नाही. 9 रोजी एस. टी. विभागाने देखील नेहमीप्रमाणे आपली वाहतूक सुरू ठेवावी. मराठा आंदोलनाच्या बाजूने आपण पूर्णपणे आश्वासन देतो की सुरू असलेली एस. टी. सेवा बंद पाडणे, रस्त्यावर झाडे टाकून वाहतूक अडविणे, टायर जाळणे अशा प्रकारचे कोणतेही प्रकार आंदोलनकर्त्यांकडून होणार नाहीत. काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून त्यांना परीक्षेच्या ठिकाणी सुरळीतपणे व वेळेत जाणे व येण्यासाठी एस. टी. ची सेवा सुरळीत सुरू राहणे आवश्यक आहे. ही सेवा विस्कळीत होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना पत्राद्वारे केली आहे. एस. टी. प्रशासनाने आपली सेवा नेहमीसारखी सुरू ठेवावी. रात्री मुक्कामाला ग्रामीण भागामध्ये एस. टी. जिथे जात असेल, तिथे नेहमीप्रमाणे पाठवावी. या उलट बससेवा बंद केली, तर जनतेला त्रास होऊन त्यामुळे नाराजी वाढेल. त्यामुळे एस. टी. महामंडळाने कोणत्याही प्रकारची बससेवा रद्द करू नये, अशी भूमिका सकल मराठा समाजाच्यावतीने सुहास सावंत यांनी मांडली.

शांततेत होणार जेलभरो आंदोलन

जेलभरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही सेवा बंद ठेवू नये. अन्यथा नागरिकांना त्याचा नाहक त्रास सोसावा लागेल, असे आवाहनही मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आले आहे. उद्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 9 ऑगस्टचे आंदोलन हे केवळ जेलभरो आंदोलन असून ते शांततामय पद्धतीने आणि लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने पार पाडण्यात येणार आहे. या आंदोलनात कोणत्याही प्रकारे हिंसेला थारा दिला जाणार नाही. जिल्हय़ातील नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या सेवा सुविधा, बाजार, शाळा, दुकाने इत्यादी नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.

सकारात्मक भूमिका

उद्याच्या आंदोलनातून सर्वसामान्य जनतेला त्रास झाल्यास सकल मराठा समाजाची प्रतिमा खराब होईल व समाजाच्या बाबतीत लोकांमध्ये नकारात्मक मत तयार होईल व तसे आम्हास होऊ द्यायचे नाही, असे मत सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱयांनी यावेळी मांडले. सकल मराठा समाजाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हय़ातील जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, या संदर्भात त्यांनी घेतलेली ही सकारात्मक भूमिका अभिनंदनीय आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सकल मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लोकांसाठी केलेल्या या आवाहनाकरिता उपजिल्हाधिकाऱयांनी आभार व्यक्त केले.

पोलीस अधिकाऱयांसह 600 पोलीस तैनात

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधवांनी पुकारलेल्या 9 ऑगस्टच्या जेलभरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून 50 पोलीस अधिकाऱयांसह 600 पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. तर आंदोलन शांततेत होण्यासाठी मराठा समाज बांधवांच्या 150 प्रमुख नेत्यांना मुंबई पोलीस अधिनियम 149 अन्वये शांतता राखण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

Related posts: