|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘हिमोफिलिया’ इंजेक्शन उसनवारीने घेण्याची वेळ!

‘हिमोफिलिया’ इंजेक्शन उसनवारीने घेण्याची वेळ! 

जिल्हा शासकीय रूग्णालयातील स्थिती

इमारतीची कामांआधी औषध पुरवठा करा

आमदार उदय सामंतांनी सुनावले

जिल्हा नियोजनमध्ये निधीसाठी प्रस्ताव ठेवणार

प्रतिनिधी /रत्नागिरी

जिल्हा रूग्णालयात ‘हिमोफिलिया’ या दुर्मिळ रक्तस्त्रावाच्या आजारावरील इंजेक्शनचा प्रचंड तुडवडा असून अमरावती, नाशिक, सातारा आदी ठिकाणांहून उसणवारीने इंजेक्शन मागवावे लागत आहे. सिव्हीलमध्ये निर्माण झालेल्या औषधांच्या या तुटवडयाबाबत आमदार उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इमारतींची कामे नंतर करा, आधी औषधपुरवठय़ावर लक्ष द्या असे खडे बोल त्यांनी प्रशासनाला सुनावले असून इंजेक्शनसाठी योग्य निधीची तरतूद करण्यासाठी जिल्हा नियोजनमध्ये प्रस्ताव ठेवणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोणत्याही कारणाने रक्तस्त्राव सुरू झाला की, तो काही केल्या थांबत नाही. त्यावर या इंजेक्शनशिवाय पर्याय नाही. हा एक दुर्मिळ आजार असून जिल्हय़ात हिमोफिलियाचे 65 रूग्ण आहेत. या रूग्णांच्या नातेवाईकांनी आमदार उदय सामंत यांनी पालकमंत्री असताना ही समस्या मांडली होती. त्यावेळी सामंत यांनी जिल्हा नियोजनमधून हिमोफिलीया इंजेक्शनसाठी 20 लाख रूपये दिले होते. मात्र आता पुन्हा या इंजेक्शनची कमतरता भासू लागली आहे. रत्नागिरी सिव्हीलमध्ये या इंजेक्शनची उपलब्धता नसल्याने कधी केईएम, सातारा, नाशिक, अमरावतीहून ते मागवावे लागते.

जिल्हय़ातून निधी नसतानाही डॉ. देवकर उसणवारीने इंजेक्शन मागवून रूग्णांची सोय करत असल्याबद्दल आमदार सामंत यांनी त्यांचे कौतुकही केले. मात्र जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाच्या दुर्लक्षाबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांच्याशी चर्चा करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

इमारतीपेक्षा औषधांकडे लक्ष द्या

जिल्हाधिकाऱयांनी इमारतीचे काम पूर्ण करण्याच्या मागे लागण्यापेक्षा सर्वसामान्य रूग्णांना भासणाऱया औषध तुटवडय़ाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सामंत यांनी सांगितल. इमारतीच्या उद्घाटनापेक्षा रूग्णांचा जीव महत्वाचा असल्याचेही ते म्हणाले. 14 ऑगस्टला होणाऱया जिल्हा नियोजनाच्या बैठकीत या औषधांच्या निधीसाठी प्रश्न व प्रस्ताव ठेवणार असल्याचेही तयांनी सांगितले.

गेल्या वर्षापासून शासनाकडून थेट औषध खरेदी बंद करण्यात आली असून ‘हॅपकिन’ कंपनीकडे खरेदीचे कंत्राट देण्यात आला आहे. मात्र जीएसटीच्या मुद्यावरून या कंपनीकडून शासनाशी काही चर्चा सुरू असल्याने पुरवठय़ात व्यत्यय येत आहे. याबाबत संताप व्यक्त करताना शासकीय रूग्णालयाला औषध पुरवठा सुरळीतपणे करणे हे प्रशासनाचेच काम असल्याचे आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केला.