|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » आज रत्नागिरी बंद

आज रत्नागिरी बंद 

ठिय्या आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन

 

प्रतिनिधी /रत्नागिरी

मराठा आरक्षणाबद्दल शासनाने कोणताही निर्णय न झाल्याने सकल मराठा समाजाच्यावतीने गुरूवारी राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्हय़ातही 9 ऑगस्ट रोजी बंद राहणार असल्याचे निमंत्रक केशवराव इंदुलकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. सर्व समाजबांधवांनी व हितचिंतकांनी हा बंद यशस्वी करण्यासाठी मेहनत घेण्याचे आवाहन त्यांनी केले. रत्नागिरीमध्ये ठिय्या आंदोलन व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी सकल मराठा समाजाच्यावतीने येथील मराठा मंडळमध्ये बैठक पार पडली. राज्यस्तरीय समन्वय समितीच्या सुचनेनुसार रत्नागिरीतही 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद पाळला जाणार असल्याचे इंदुलकर यांनी सांगितले. गेल्यावर्षी 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी आझाद मैदानावर महामूक मोर्चा आंदोलन करण्यात आले होते. त्याचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त हा निर्णय घेण्यात आला आहे. पत्रकार परिषदेला अविनाश सावंत, प्रतापराव सावंत, सुधाकर सावंत, अमित देसाई हे उपस्थित होते.

राज्यामध्ये उद्योग व्यवसाय व्यापार, माल वाहतुक, प्रवासी वाहतूक, शाळा कॉलेज आदी सर्व घटक बंदमध्ये समाविष्ट राहणार आहे. चिपळूण, खेड, दापोली, लांजा, राजापुर या तालुक्यांनी यापुर्वीच गुरूवाच्या बंदची घोषणा केली आहे. संगमेश्वर, मंडणगड, गुहागर हे तालुकेही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

रत्नागिरीतील या बंदचा आरंभ करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी, प्रतिनिधींनी, महिला, तरूण-तरुण, विद्यार्थी-विद्यार्थीनी व सकल समाजातील सर्वांनीच सकाळी 9 वाजता मारूतीमंदिर येथे छ. शिवाजी महाराज पुतळय़ाजवळ एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून उपस्थित बांधवांसह शांततेने, संयमाने व शिस्तीने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाने जाणार आहे. तेथे गेल्यावर ठिय्या आंदोलन होणार असून त्यामध्ये सकल मराठा समाजातील सर्व घटकांनी, अबाल-वृध्दांनी सक्रिय सहभाग घेत आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन इंदुलकर यांनी केले आहे. हे आंदोलन शांततेत व संयमाने, शिस्तीने होण्यासाठी दक्षता घेतली जाणार आहे. या आंदोलनावेळी जर अनुचित घटना घडली तर त्याला सकल मराठा समाज जबाबदार राहणार नाही असेही इंदुलकर यांनी सांगितले.

‘महाराष्ट्र बंद’ बाबत विविध संघटनांकडे लक्ष

3 ऑगस्टच्या रत्नागिरीत झालेल्या आंदोलनावेळी स्थानिक स्तरावरून व्यापारी, दुकानदार, वाहतूकदार संघटना, तसेच शाळा-महाविद्यालय संस्था यांनी सक्रीय पाठींबा दर्शवला होता. मात्र आज होणाऱया महाराष्ट्र बंदच्या या आंदोलनाला या संघटना कशाप्रकारे पाठींबा देणार याकडे साऱयांचे लक्ष वेधले आहे.

चिपळुणात बंदसह ठिय्या आंदोलन

चिपळूण तालुक्यात ठिय्या आंदोलनासह कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. त्याचबरोबर सावर्डे परिसरातील 54 गावांसह सावर्डे, वहाळ, निवळी, पालवण, असुर्डे बाजारपेठा बंदमध्ये सहभागी होणार आहेत. शिस्तबद्ध बंद पार पाडण्याच्यादृष्टीने समन्वयक प्रयत्न करीत आहेत. दगडफेक, तोडफोड, जाळपोळ कुणीही करणार नाही. याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गुरूवारी सकाळी 9 वाजता महामार्गावरील हॉटेल अतिथी येथे मराठा समाज बांधव एकत्र जमणार आहेत. त्यानंतर मध्यवर्ती बसस्थानक, भोगाळे मार्गे चिंचनाका व तेथून नगर परिषदेसमोर येऊन तेथील शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. यानंतर ही फेरी बाजारपेठेतून चिंचनाका मार्गे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रांत कार्यालयावर धडकणार आहे. तेथे ठिय्या आंदोलन होईल. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.

दरम्यान, सावर्डे, वहाळ, निवळी, पालवण असुर्डे येथील बाजारपेठा, रिक्षा, खासगी वडाप, चिपळूण एस. टी. सेवा बंद राहतील. स्कूल बस सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. सावर्डे डेरवण रुग्णालयातील औषधाचे दुकान वगळता सावर्डे बाजारपेठेतील औषधाची दुकाने व खासगी दवाखाने बंद राहणार आहेत. तातडीची सेवा म्हणून एक रुग्णवाहिका (कालिका बचत गट) सावर्डे बसथांब्याजवळ उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक गावातील दुकाने बंद करण्यासाठी त्या-त्या गावात व्यापारीवर्गास विनंती करून रेशन दुकाने व किराणा दुकान बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

54 गाव सकल मराठा अध्यक्ष केतन पवार व शेखर निकम यांच्या उपस्थित सकाळी 10 वाजता सकल मराठा बांधव व भगिनी संपर्क कार्यालयात जमणार असून या कार्यालयातून पायी चालत सावर्डे राजस्थानी हॉटेल ते डेरवण फाटा ते कार्यालय अशी बाजारपेठेतून फेरी काढण्यात येणार आहे.

दापोली बंद नाही; फक्त आंदोलन!

आंदोलनाला आमचा पाठींबा आहे, मात्र दापोली बंद न ठेवता फक्त सरकारच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱयांकडून सांगण्यात आले. 26 जुलै रोजी दापोली बंदमध्ये दापोलीकरांनी सहभागी होत आपली दुकाने, शाळाही बंद ठेवल्या होत्या. त्यानंतर 28 जुलै रोजी कृषी विद्यापीठाच्या 30 कर्मचाऱयांचे अपघाती निधन झाल्याने दोन दिवस दापोली बंद होती. त्यामुळे 9 रोजी तालुका बंद करण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

खेडमध्ये आज मोर्चा

खेड तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने 9 ऑगस्ट रोजी मोर्चा काढून जेलभरो व ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता गोळीबार मैदानातून मोर्चास प्रारंभ होणार असून तहसीलदार कार्यालय, शिवाजी चौक, वाणीपेठ, बाजारपेठ, सोनारआळी-गणपती मंदिर मार्गावरून हा मोर्चा नगरपरिषदेतील शिवपुतळय़ास, तीनबत्ती नाका येथील हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करणार आहेत. यानंतर आमदार, खासदार, पोलीस निरीक्षक, प्रांताधिकाऱयांना निवेदन देण्यात येईल.