|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 4 दहशतवाद्यांचा काश्मिरात खात्मा

4 दहशतवाद्यांचा काश्मिरात खात्मा 

रफियाबादच्या जंगलांमध्ये चकमक

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू आणि काश्मीरच्या रफियाबाद येथील जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांसोबत सैन्याची बुधवारी चकमक झाली. सध्या तेथे दोन्ही बाजूने गोळीबार होत असून या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सैन्याने यश मिळविले. तर एक दहशतवादी लपून बसला असल्याचे मानले जात आहे. या चकमकीदरम्यान एक पॅराकमांडो गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दहशतवाद्यांबद्दल गोपनीय माहिती मिळाल्यावर सैन्याने संबंधित परिसराला घेरून शोधमोहीम सुरू केली. सैन्याच्या मोहिमेमुळे धास्तावलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, ज्यानंतर सैन्याने देखील चोख प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केला. सूत्रानुसार हे दहशतवादी नियंत्रण रेषेच्या पलिकडून घुसखोरीच्या प्रयत्नात होते. मारले गेलेल्या घुसखोरांच्या अन्य सहकाऱयांना पकडण्यासाठी सैन्याने हेलिकॉप्टरच्या मदतीने चकमकस्थळी पॅराकमांडेंचे पथक उतरविले. काश्मीरमध्ये शिरण्यासाठी दहशतवाद्यांकडून वापरले जाणारे सर्व संभाव्य मार्ग, नाले इत्यादी ठिकाणी सैन्याने शोधमोहीम राबविल्याने घुसखोरांची कोंडी झाली आहे.

या अगोदर स्वातंत्र्यदिनी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा हल्ला घडवून आणण्यासाठी पाकिस्तानातून घुसखोरी करणाऱया 2 दहशतवाद्यांना सैन्याने कंठस्नान घातले होते. उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्हय़ाच्या गुरेज सेक्टरमध्ये सैन्याच्या एका मोठय़ा मोहिमेत 1 मेजर आणि 3 सैनिक हुतात्मा झाले होते.