|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » खेड-चिपळुणात कडकडीत बंद!

खेड-चिपळुणात कडकडीत बंद! 

आरक्षणासाठी हजारो मराठा बांधव रस्त्यावर, शहरांसह गावांतील सर्व व्यवहार बंद, बाजारपेठांसह रस्त्यांवर शुकशुकाट,

मोर्चाने महामार्ग ठप्प

शाळा, महाविद्यालयांसह वाहतूकही बंद

प्रतिनिधी /चिपळूण

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी चिपळूण व खेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. प्रमुख गावांत सर्व व्यवहारा बंद होते. एस. टी बरोबरच व खासगी वाहतूकही बंद होती. शाळा, महाविद्यालयांनी काही ठिकाणी घोषीत तर बऱयाच ठिकाणी अघोषीत सुट्टी होती. हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या मराठा बांधवांनी संयमाचे दर्शन घडवले. या आंदोलनामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग बराचकाळ बंद राहिल्याने होता. अन्य तालुक्यांमध्येही मराठा बांधवांकडून मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात आले.

‘एक मराठा, लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा देत गुरूवारी सकाळपासूनच गावागावांतून मराठा बांधव शहरांकडे येत होते. महामार्गावरील हॉटेल अतिथी येथे एकत्र आलेल्या या मराठा बांधवानी भगवे ध्वज फडकवत मोर्चाला सुरूवात केली. ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, आरक्षण देता की सत्तेवरून जाता’ अशा दिल्या जात असलेल्या घोषणांनी शहर दणाणून गेले. दरम्यान, हा मोर्चा मेहता पेट्रोलपंप, चिंचनाका मार्गे नगर परिषदेजवळ पोहचला असता मोर्चातील तरूणानी शिवपुतळय़ाला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर बाजारपेठेतून बसस्थानक, पॉवर हाऊसमार्गे हा मोर्चा प्रांत कार्यालयाजवळ धडकला.

प्रांत कार्यालयासमोर ठिय्या

प्रांत कार्यालयाजवळ महामार्गावरच ठिय्या मांडल्यानंतर तेथे शासनाला देण्यात येणाऱया निवेदनाचे वाचन करण्यात आले. यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे, आरक्षणावरून आत्महत्या करून हुतात्मा झालेल्यांच्या कुटुंबियांना नोकरी, आर्थिक मदत द्यावी, मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत अशा मागण्यांचे निवेदन युवतींकडून तहसीलदार जीवन देसाई यांना सादर करण्यात आले. याचबरोबर मराठा समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात काहीनी आपली मतेही मांडली.

बाजारपेठेत शुकशुकाट

बंदमुळे नेहमी गजबजणाऱया शहरातील बाजारपेठेत गुरूवारी पूर्णत शुकशुकाट होता. साधी टपरीदेखील सुरू नव्हती. एस. टी. बस, खासगी वाहतूक, रिक्षासह मालवाहतूक संघटनेनेही बंदला पाठिंबा देत व्यवहार बंद ठेवल्याने गुरूवारी शहरातील बाजारपेठेतील रस्ते सामसूम होते. रूग्णालये आणि मेडिकल दुकाने वगळता बाजारपेठ ठप्प होती.

महामार्गावरील वाहतूक बायपासमार्गे

दुपारी 12.30 वाजता मुंबई-गोवा महामार्गावर पॉवर हाऊस येथे मोर्चा आल्यानंतर पूर्ण मार्ग मोर्चेकऱयांनी भरून गेला. त्यानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत मोर्चेकरी प्रांत कार्यालयाजवळ ठिय्या मांडून बसल्याने महामार्ग पूर्णतः ठप्प झाला. परिणामी वाहतूक फरशी तिठा, उक्ताड बायपास मार्गे वळवण्यात आली. त्यातच अवजड वाहतूक मात्र दोन्ही बाजूंना थांबवण्यात आली. सायंकाळी 5 वाजता ठिय्या आंदोलन संपल्यानंतर महामार्ग पूर्ववत झाला.

रॅलीने सावर्डे भगवेमय

चिपळूण शहराबरोबरच सावर्डे, वहाळ, निवळी, पालवण, असुर्डे, खेर्डी, मार्गताम्हानेसह प्रमुख गावांमध्ये व्यवहार ठप्प होते. गुरूवारी सकाळी 10 वाजता परिसरातील मुर्तवडे कोकरे, सावर्डे या तिन्ही जिल्हा परिषद गटातील 54 गावांतील मराठा समाज बांधव हातात मराठा क्रांतीचा झेंडा घेऊन सावर्डे संपर्क कार्यालयात एकवटला. यामुळे सावर्डे येथे वातावरण भगवेमय झाले. आरक्षणावरून बलिदान दिलेल्या बांधवाना व देशाच्या सीमेवर वीरमरण पत्करलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून रॅलीला सुरूवात करण्यात आली. सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, जिल्हा परिषद सदस्य बाळ जाधव यांच्यासह पूजा निकम, केतन पवार यांनी या रॅलीत सहभाग घेत बांधवांमध्ये प्रेरणा दिली. या रॅलीत 54 गावांतील सुमारे 2000 बांधवांनी सहभाग नोंदवला. सावर्डे संपर्क कार्यालयातून मुंबई-गोवा महामार्ग ते स्वामी समर्थ मंगल कार्यालय व तेथून महामार्गावरून सावर्डे पोलीस स्थानक आणि तेथून मराठा संपर्क कार्यालयापर्यंत ही भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी अनिरुद्ध निकम यांनी उपस्थित मराठा बांधवांना मार्गदर्शन केले.

रामपूर, मार्गताम्हानेतही बंद

दरम्यान, रामपूरसह मार्गताम्हानेतील बाजारपेठा बंद ठेवत शेकडो मराठा बांधव, महिला या आंदोलनात उतरल्या. दुचाकी रॅली काढून सर्वजण चिपळूणच्या मोर्चात सहभागी झाले. अजित साळवी, पप्या चव्हाण, अनिल साळवींसह मराठा बांधव सहभागी झाले.

चिपळूण बाजारपेठ सोमवारी सुरू राहणार

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने गुरूवारी येथे काढलेल्या मोर्चाला चिपळूण किराणा व्यापारी महासंघाने पाठिंबा देऊन बाजारपेठ बंद ठेवली. त्यामुळे ग्राहकांच्या सोयीसाठी सोमवारी 13 ऑगस्ट रोजी बाजारपेठ सुरू राहणार असल्याचे महासंघाचे अध्यक्ष वासुदेव भांबुरे यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले.

खेडमध्ये संयमी मोर्चा

खेडः खेडमध्ये सकल मराठा समाज बांधवांनी संपूर्ण बाजारपेठेतून संयमी मोर्चा काढत प्रांताधिकारी कार्यालयासमोर सलग 6 तास ठिय्या आंदोलन केले. व्यापाऱयांनीही बाजारपेठ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले. आदोलनामुळे महामार्गही ठप्पच होता.

भरणे येथील काळकाई देवीची ओटी भरल्यानंतर मराठा समाजबांधवांनी पूर्णाकृती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण केला. गोळीबार मैदानातून सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मोर्चास प्रारंभ झाला. शिवाजीचौक, वाणीपेठ, बाजारपेठ, सोनारआळी, गणपती मंदिर येथून नगर परिषद येथील शिवाजी महाराज व तीनबत्तीनाका येथील हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण केल्यानंतर मोर्चा आमदार संजय कदम यांच्या येथील मध्यवर्ती कार्यालयासमोर धडकला. मराठा समाजबांधवांनी मागण्यांचे निवेदन सादर केल्यानंतर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या कार्यालयातही निवेदन सादर करण्यात आले.

पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांना निवेदन दिल्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात 10हून अधिक बैलगाडय़ांचाही समावेश होता. याचठिकाणी मराठा समाजबांधवांनी ठिय्या आंदोलन केले. प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने व तहसीलदार अमोल कदम यांना विविध मागण्यांचे निवेदन पाच युवती प्रतिनिधींच्या हस्ते देण्यात आले. या मोर्चात मुस्लिम समाजबांधव तसेच व्यापारी संघटनेनेही पाठिंबा देत संपूर्ण बाजारपेठेत कडकडीत बंद पाळला.

ठिकठिकाणी आंदोलकांनी महामार्ग रोखल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूंकडील वाहतूक ठप्प झाली. पिरलोटे येथे मराठा समाजबांधवांनी लोटे औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमध्ये सकाळी पहिल्या सत्रात कामगारांना घेऊन येणाऱया बसेस माघारी पाठवल्याने रात्रपाळीच्या कामगारांना पुन्हा पहिल्या पाळीसाठी काम करावे लागले. नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी शिवाजी चौक येथे मोर्चेकऱयांसाठी मोफत पाण्याची सोय केली होती. मोर्चेकऱयांसाठी अल्पोपहाराची व्यवस्थाही करण्यात आली होती.

मोर्चात मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष केशवराव भोसले, आमदार संजय कदम, युवासेना कोअर कमिटी राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, तालुकाध्यक्ष स. तु. कदम, भाजपचे प्रभारी शशिकांत चव्हाण यांच्यासह मराठा समाजबांधव, विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी बहुसंख्येने सहभागी झाले होते. बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांची जादा कुमक तैनात करून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related posts: