|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगलीसह जिल्हय़ात कडकडीत बंद

सांगलीसह जिल्हय़ात कडकडीत बंद 

प्रतिनिधी /सांगली :

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला जिह्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. सांगली शहरासह तालुक्याच्या ठिकाणी व्यापारी, विक्रेते व व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवल्याने बाजारपेठा ओस पडल्या होत्या. काही ठिकाणी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी रस्त्यांवरच टायरी जाळत संतापाला वाट मोकळी करुन दिली. शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. तर एस.टी. डेपोतून एकही एसटी बाहेर पडली नाही, त्यामुळे जिह्यातील जनजीवन ठप्प झाले होते. बंद दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी सांगली शहर व परिसरात परिस्थितीची पाहणी केली. येथील स्टेशन चौकात सुरु असलेल्या आंदोलनाला जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी भेट दिली. उपस्थित महिला आंदोलकांच्याहस्ते त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मराठा आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन सरकारकडे तात्काळ पाठवू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. याशिवाय जिल्हा पोलीस प्रमुखही आंदोलन काळात संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यात 58 मूक मोर्चे काढण्यात आले. मात्र शासनाकडून त्याची गांभिर्याने दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे मराठा समाजाने राज्यभरात ठोक मोर्चे काढण्यास सुरूवात केली आहे. राज्यभरात या मोर्चे व आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सांगलीतही गेल्या तीन †िदवसांपासून ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचे निमित्त साधत जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते.

Related posts: