|Monday, October 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही थर्माकोलवर बंदी आवश्यक

महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही थर्माकोलवर बंदी आवश्यक 

प्रतिनिधी /पणजी :

महाराष्ट्र सरकारने प्लास्टिकसह थर्माकोलच्या वापरावर बंदी घातल्याने महाराष्ट्रात तयार झालेली अनेक थर्माकोलची मखरे गोव्यात आली आहेत. त्यामुळे आता गणेश चतुर्थीसमोर नव्याने प्रदूषणाचे संकट निर्माण झाले आहे.

गोव्याने प्लास्टिकवर अद्याप बंदी घातलेली नाही. गेली अनेक वर्षे गोव्यात प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी घालण्यात यावी, यासाठी पर्यावरणप्रेमी मागणी करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. या संधीचा फायदा उठवून महाराष्ट्रात विशेषत: पुणे व मुंबईहून मोठय़ा प्रमाणात गणेश चतुर्थी व नवरात्रोत्सवासाठी तयार केलेली थर्माकोलची मखरे गोव्यात पाठविली आहेत. गोव्यात थर्माकोलच्या मखराना वाट्टेल तो दर मिळत असल्याने ही मखरे पाठविण्यात आली आहेत.

थर्माकोल जाळणे अत्यंत हानिकारक

प्रत्यक्षात थर्माकोलपासून बनविलेली मखरे नाजूक असतात. चतुर्थी झाल्यानंतर ती मोडतात. क्वचित कोणाच्या तरी घरी ही मखरे काही महिने जपून ठेवली जातात. अन्यथा तुटलेली ही मखरे जुळवणे कठीण होते. त्यानंतर या कचऱयाचे करायचे काय? हा प्रश्न पडतो. कित्येकजण हे थर्माकोल जाळून टाकतात. त्यातून निर्माण होणारा वायू हा अत्यंत विषारी व कर्करोगाला निमंत्रण देणारा आहे.

गोव्यात अद्याप थर्माकोलच्या सार्वजनिक वा घरगुती वापरावर बंदी का घातली जात नाही हे कळत नाही. मात्र थर्माकोलच्या कचऱयाचे ढीग सर्वत्र सापडतात. स्थानिक पालिकांना या कचऱयाचे करायचे काय हा देखील प्रश्न पडतो. थर्माकोल हा आरोग्यास घातक आहे, याची जाणीव असून देखील थर्माकोलचा वापर गणपती समोर आरास करण्यासाठी सर्रासपणे होतो. त्यावर राज्य सरकारने महाराष्ट्राप्रमाणेच बंदी आणण्याची आवश्यकता आहे.

Related posts: