|Sunday, February 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगाव विमानतळावर आजपासून नवा अध्याय

बेळगाव विमानतळावर आजपासून नवा अध्याय 

प्रतिनिधी /बेळगाव :

बेळगाव विमानतळ आणि समस्त बेळगावकरांसाठी शुक्रवारचा दिवस आगळावेगळा आणि अभिमानाचा असणार आहे. या विमानतळाच्या विस्तारीकरणानंतर सर्वात प्रथम जेट श्रेणीतील प्रवासी विमान दाखल होणार असून बेळगाव-बेंगळूर अशा विमानसेवेचा कार्यारंभ होईल. एका नव्या अध्यायाचा साक्षीदार बेळगाव विमानतळ होणार असून यानंतर नवनव्या मार्गांवरील अद्ययावत विमानसेवेची नांदी सुरू होऊ शकणार आहे.

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, बेळगावपेक्षा हुबळीला झुकते माप, उडान योजनेमुळे असलेली विमानसेवाही बंद होण्याचे संकट असे अनेक प्रकार बेळगाव विमानतळाने अनुभवले आहेत. विस्तारीकरण आणि विकासाची प्रक्रिया सुरू असतानाच विमानसेवा बंद होण्याची परिस्थिती दुर्दैवी ठरत होती. अशातच एअरबस-319 ही एअर इंडियाची जेट श्रेणीतील प्रवासी विमानव्यवस्था या विमानतळावर दाखल होते, ही समाधानाची बाब आहे.

पूर्वी लहान आकाराचे असल्याने बेळगाव विमानतळावर अनेक बंधने होती. अतिशय लहान आकाराची विमाने या विमातळावर उतरू शकत होती. अतिशय लहान आकाराची एवरो, डॉर्नियर्स, एटीआर अशी विमाने येथे पूर्वी आली आहेत. धावपट्टीचे विस्तारीकरण झाल्यानंतर सी प्रकारची विमाने येथे येऊ लागली. काही अति मोठय़ा आकाराची विमानेही सांबरा विमानतळवर येऊन गेली आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बोईंग-737 हे व्हीआयपी विमान तसेच लष्करी सेवा दरम्यान दाखल झालेले अमेरिकन हवाई दलाचे मार्टीन्स सी-17 हे विमान ही काही उदाहरणे आहेत.

आजपासून बेळगाव-बेंगळूर ही विमानसेवा सुरू होणार आहे. यासाठी एसएमएसची मोहीम, सेव्ह आयएक्सजी अभियान तसेच बेळगाव सिटीझन्स कौन्सिलच्यावतीने झालेले प्रयत्न तितकेच कारणीभूत ठरले आहेत.

Related posts: