|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शहरातील 450 कोटींच्या कामांना मंजुरी

शहरातील 450 कोटींच्या कामांना मंजुरी 

प्रतिनिधी/ सोलापूर

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध विकास कामे करताना शहरातील पाणीपुरवठय़ास प्रथम प्राधान्य देण्यात येत असून, स्मार्ट सिटी भागात दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी 192 कोटींच्या नवीन आराखडय़ास आणि 450 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

  सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडची संचालक मंडळाची चौथी बैठक शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात अध्यक्ष असीम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस महापौर शोभा बनशेट्टी, सभागृह नेते संजय कोळी, विरोधी पक्षनेते महेश कोठे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, एमओयुडीचे पीसी दशमाना, संचालक प्रा. नरेंद्र काटीकर, चंद्रशेखर पाटील, स्मार्ट सिटी अभियंता तपन डंके, नगरअभियंता संदीप कारंजे, सहा नगररचना संचालक लक्ष्मण चलवादी, महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे, विद्युत विभाग अभियंता राजेश परदेशी, स्मार्ट सिटी प्रोजेक्टर कविता वाकडे, चीफ फायनान्सियल ऑफीसर मनीष कुलकर्णी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

  स्मार्ट सिटी प्राधिकरणाच्या बैठकीत शहरातील पाणीपुरवठय़ाकडेच अधिक लक्ष केंद्रीय करण्यात आले असून, पाणीपुरवठय़ाच्या दुहेरी जलवाहिनी योजनेसाठी स्मार्ट सिटी व एनटीपीसी यांच्या 450 कोटींच्या योजनेच्या कामाला गती देण्याबरोबरच स्मार्ट सिटी परिसरातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी 192 कोटींच्या योजनेला मंजुरी देण्यात आली. विविध 450 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. हीकामे कोणत्याही परिस्थितीत डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले.     

  शहरातील स्मार्ट सिटी परिसरात असलेली पुरातन वास्तू महापालिका इमारत आणि मनपा शाळा या आणखी 100 वर्षे टिकतील या हिशोबाने चांगले करण्यात येऊन त्यांना सुशोभित करण्यात येणार आहे. लक्ष्मी मार्केट नुतनीकरण करण्याचे काम, इंदिरा गांधी स्टेडियम नुतनीकरण, सिध्देश्वर तलाव सुशोभिकरण या कामांनाही वेग देण्यात येणार असून, या कामांचे प्रस्ताव पुरातत्व विभागाकडे परवानगीसाठी पाठविण्यात आले आहेत.

  होम मैदान सुशोभिकरण, पासपोर्ट कार्यालय लगत उद्यान ही कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. सात रस्ता परिसरातील बाजारचे प्रोजेक्ट तयार करण्यात आले आहे. याला परवानगी मिळाली तर 8 कोटी रुपये खर्च करुन अद्यावत स्वरुप देण्यात येणार आहे. सात रस्ता बस डेपो येथे 20 कोटी रुपये खर्चून परिवहन वर्कशॉप कार्यालय व व्यवसायिक संकूल बांधण्यात येऊन विकसित करण्यात येणार आहे. तसेच शासकीय कार्यालयावर रुफ टॉप सोलार बसविणे व अन्य कामे हाती घेण्यात येणार असून, या कामांनाही वेग देण्यात येणार असल्याचे असिम गुप्ता यांनी स्पष्ट केले.

  दहा एकर जागेत होणार प्रदर्शन केंद्र

स्मार्ट सिटी योजनेतून विविध प्रकल्प होत असताना स्मार्ट सिटी परिसराला लागूनच पालिकेची दहा एकर जागा आहे. या दहा एकर जागेत योजनेतून 10 कोटी रुपये खर्च करुन पार्किंगच्या चांगल्या सोयीसह अद्यावत प्रदर्शन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. होम मैदान येथे भरणारे प्रदर्शन, सर्कस व अन्य करमणुकीचे सर्व प्रकार आता त्या अद्ययावत जागेत घेण्याचे व त्याला महापालिकेकडून मान्यता घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्मार्ट सिटी भागात दररोज पाणीपुरवठा

स्मार्ट सिटी भागात दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी झाली आहे. यावरुनच आता या परिसरातील अंतर्गत जलवाहिनीची लाईन टाकणे व इतर कामांसह ड्रेनेज लाईनची कामे करण्यासाठी नव्याने 192 कोटींची योजना तयार करुन त्याला मंजुरी देण्यात आली.  यामुळेच त्या परिसराला दररोज पाणीपुरवठा होणार असल्याचे सांगितले. दुहेरी जलवाहिनीचे काम येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येऊन भविष्यातील 30 वर्षांची शहरवासियांची पाण्याची गरज याद्वारे भागणार आहे यानंतर मात्र शहरालाही दररोज पाणीपुरवठा शक्य होणार आहे.त्यामुळे पाणीपुरवठय़ाच्या कामांना प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे.

 

270 कोटींचे रस्त्यांची कामे मंजूर

स्मार्ट सिटी योजनेत शहरात 270 कोटींचे रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहे. यामधून 70 कोटींचे रस्त्यांचे टेंडर निघाले आहेत. येत्या 4 ते 6 महिन्यात 200 कोटींचे रस्त्यांची कामे शहरात दिसून येतील.तसेच स्मार्ट सिटी भागात काँक्रीट व डांबरीकरण करून 13 रस्ते विकसित करण्यात येणार आहेत.

 

एलईडीचा पालिकेने निर्णय न घेतल्यास…..

शहरात 40 हजार एलईडी पथदिवे मक्त्याचा निर्णय पालिकेने वेळेत न घेतल्यास स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनकडून एबीडी एरियात काम करण्यात येईल. यासाठी सुमारे 37 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असे अध्यक्ष गुप्ता यांनी सांगितले.