|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कळंगुटमध्ये मटका प्रकरणी 29 जणांना अटक

कळंगुटमध्ये मटका प्रकरणी 29 जणांना अटक 

प्रतिनिधी/ म्हापसा

गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ओर्डा कळंगुट येथे भर वस्तीत चालणाऱया मटका बीट सेंटरवर छापा घालून 29 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील मटका बीट घेण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, भ्रमणध्वनी, संगणक आदी जप्त केले आहे. मटक्याचा मुंबई बाजार ओपन होण्याच्या अवघ्या पंधरा मिनिटांपूर्वीच हा छापा घातल्याने अखेर मुंबईहून मुंबई मेन बाझार बंद ठेवण्यात आला. त्यामुळे शुक्रवारी रात्री मुंबई मटका येऊ शकला नाही.

गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तगुरू सावंत व प्रज्योत फडते यांच्या नेतृत्त्वाखाली हवालदार संतोष गोवेकर, संजय पेडणेकर, दत्ता वेर्णेकर, नवीन पालयेकर, राकेश हळर्णकर यांनी हा छापा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली टाकला.

मटका बीट सेंटरवर छापा

मिळालेल्या माहितीनुसार कळंगुट ओर्डा येथे मटक्याच्या मुंबई मेन बाझारचा मुख्य अड्डा होता. येथे राज्यातून बीट येत होती. येथूनच मुंबईला कटींग बीट देण्यात येत होती. मात्र याप्रकरणी मुख्य सुत्रधारालाच ताब्यात घेतल्याने अखेर मुंबई येथून मेन बाझार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मेन बझाराचा ओपन आकडा येऊ शकला नाही. रात्री 9 वाजेपर्यंत सर्वत्र राज्यात बीट घेण्यात आली होती. मात्र राज्यातून चालविण्यात येणारे सर्व कटींग कळंगुट या अडय़ातून वर काढली जायची. छाप्याची माहिती मिळताच अखेर मेन बाझार बंद केल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी रोकड सापडू शकली नसली तरी इंटरनेटवर सर्व व्यवहार कॅशलेस होत होता अशी माहिती देण्यात आली.

मुख्य संशयित सावळला अटक

याप्रकरणी राज्यातून मुख्य सुत्रे हलविणारे सूत्रधार जयेश शहा, छोटूलाल लालन यानाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार राज्यात आणि खास करून बार्देश तालुक्यात मुख्य एजंट आहे, त्याच्या शोधात पोलीस आहेत. मेन बाजारच्या राज्यात व्यवहार चालविणारे मुख्य संशयित प्रकाश सावळ याला पोलिसांनी अटक केला आहे.

कळंगुट पोलीस पडले उघडे

क्राईम ब्रांचने हा छापा टाकून 29 जणांना अटक केल्यामुळे कळंगुट पोलीस मात्र याप्रकरण उघडे पडले आहेत. या सेंटरवरून बीट घेऊन कटींग करण्याचे काम होत होते याद्वारे राज्यात करोडो रूपयांचा व्यवहार सुरू होता. जुगार कायदा अंतर्गत पोलिसांनी या 29 जणांवर गुन्हा नोंद केला आहे.

या छाप्यामुळे राज्यातील मटका बीट घेणाऱयांचे धाबे दणाणले आहेत.