|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » डोक्यात जांभा घालून सरपंच पत्नीची हत्या!

डोक्यात जांभा घालून सरपंच पत्नीची हत्या! 

चिपळूणात कादवाडमधील घटना,

चारित्र्याच्या संशयावरून कृत्य

24 तासांतील दुसऱया घटनेने चिपळूण हादरले,

फरार पती पोलिसांच्या ताब्यात,

 

प्रतिनिधी /चिपळूण

कादवड येथील सरपंच पत्नीच्या डोक्यात जांभा दगड घालून तिची हत्या केल्याचा खळबळजन प्रकार शनिवारी पहाटे घडला. चारित्र्याच्या संशयातून हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी चौकशीत पुढे आले असून फरार पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले. किरकोळ भांडणातून मापारी मोहल्ल्यात पत्नीचा खून झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत दुसरा प्रकार घडल्यानेत चिपळूण तालुका हादरला आहे.

सोनाली दीपक जाधव (35, कादवड-कातकरवाडी) असे या या खून झालेल्या सरपंच महिलेचे नाव असून तिचा पती दीपक तुकाराम जाधव याला ताब्यात घण्यात आले आहे. त्यांची मुलगी किरण दीपक जाधव हिने शिरगाव पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये रात्री उशिरापर्यंत भांडण सुरू होते. यावेळी शिविगाळही सुरू होती. यामुळे कंटाळलेल्या सोनाली जाधव यांनी सोडचिठ्ठी देते असे सांगितले. यामुळे संतापलेल्या दीपक जाधव याने घराबाहेर असलेला जांभा दगड उचलून सोनाली यांच्या डोक्यात घातला. यामध्ये त्या जागीच ठार झाल्या. ही घटना पहाटे 3.30 च्या सुमारास घडली.

झोपेतच घडला सर्व प्रकार

दीपक जाधव हा नेहमीच रात्री उशिरापर्यंत पत्नी सोनाली यांना शिविगाळ करत होता. हा प्रकार नेहमीचाच झाल्याने भांडणानंतर काहीवेळाने सोनाली जाधव व दोन्ही मुले झोपी गेली. मात्र हे सर्वजण झोपेत असतानाच दीपकने डाव साधला आणि सोनालीचे आयुष्य संपवले. या सर्व प्रकाराने मुलगी किरण जाधव (18) व मुलगा रोहीत जाधव (16) हे खडबडून जागे झाले. मात्र तोपर्यंत त्यांची आई त्यांच्या आयुष्यातून निघून गेली होती. यावेळी दोघांनी एकच हंबरडा फोडला. त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून वाडीतील काहींनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

घटनेनंतर पतीने काढला पळ

या प्रकारानंतर खुनी दीपक जाधव याने पहाटेच्या वेळीच घरातून पळ काढला. त्यानंतर मुलगी किरण जाधव हिने शेजाऱयांच्या मदतीने पोलीस स्थानक गाठून या घटनेविषयी पोलिसांना माहिती दिली. यावेळी केलेल्या चौकशीत दिपक काहीजणांना पिंपळी व त्यानंतर कामथे येथे दिसून आल्याचे समजले. त्याचा पोलीस शोध घेत होते. मात्र कामथे येथून बसने तो बहादूरशेखनाका व तेथून अलोरे येथील बस थांब्याजवळ आला आणि तेथेच थांबला असताना तो पोलिसांना सापडला. त्याला तातडीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरूध्द भादंवि कलम 302 व 504 अन्वये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारकिर्द संपण्याआधीच जीवन संपले!

सोनाली जाधव यांची 24 ऑगस्ट 2015 रोजी यांची कादवडच्या सरपंचपदी निवड झाली होती. त्यांची सरपंचपदाची कारकीर्द पूर्ण होण्यासाठी अवघ्या 12 दिवसांचा कालावधी शिल्लक होता. मात्र त्याआधीच पतीने त्यांची हत्या केल्याने त्यांचे जीवनच संपले आहे. अवघे पाचवीपर्यंतचे शिक्षण झालेल्या सोनाली या सरपंचपदाचे काम मात्र प्रामाणिकपणे व कुशलतेने करत होत्या. त्यांच्या कर्तबगारीमुळे त्यांना शिक्षणाची कधीच अडचण आली नाही. याविषयी त्यांच्या मुलांनाही तितकाच अभिमान वाटत होता. सध्या मुलगी किरण ही एका खासगी दवाखान्यात नर्स म्हणून काम करत असून मुलगा रोहीत हा दापोली येथे 11वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.