|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » डिझेल संपल्याने एस.टीचा बोजवारा!

डिझेल संपल्याने एस.टीचा बोजवारा! 

तब्बल 170 फेऱया होत्या रद्द

प्रवासी-विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल

इंधन टँकरना आंदोलनाचा फटका

प्रतिनिधी /रत्नागिरी

रत्नागिरी एस. टी. आगारातील डिझेलचा साठा शनिवारी दुपारी संपल्याने ए.टी. सेवचा चांगलाच बोजवारा उडाला. डिझेल अभावी तब्बल 170 फेऱया रद्द करण्यात आल्यान विद्यार्थ्यांसह नागरिकांचे प्रचंड हाल झाले. आठवडा बाजार असल्याने बसस्थानकात मोठी गर्दी झाली होती. या प्रवाशांना सायंकाळी उशीरापर्यंत ताटकळत थांबावे लागले. मराठा आंदोलनामुळे डिझेलचे टँकर पोहचण्यात उशीर झाल्याने हा प्रकार घडल्याचे एस.टी. प्रशासनाने स्पष्ट केले.

रत्नागिरी एस. टी. आगाराला दररोज 12 हजार लिटर डिझेल पुरवठा होतो. मात्र दोन दिवसांपूर्वी राज्यात मराठा मोर्चा असल्याने डिझेल टँकर वेळेत पोहचू शकले नाही. त्यामुळे उपलब्ध डिझेलवरच दोन दिवस काम भागवले जात होते. शनिवारी दुपारपर्यंत 50 टक्केच गाडय़ांना डिझेल पुरवठा झाला. त्यानंतर डिझेल साठा संपल्याने दुपारी 1 ते 6 या वेळेत तब्बल 170 फेऱया रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.

शनिवारी सकाळची शाळा संपवून दुपारी घरी जाण्यासाठी निघालेल्या अनेक विद्यार्थ्यांना याचा फटका बसला. बहुतांश विद्यार्थ्यांना बसस्थानका अथवा शाळेजवळील थांब्यावर ताटकळत राहण्याची वेळ आली. त्यातच आठवडा बाजाराचा दिवस असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या ग्राहकांना फटका बसला. त्यामुळे बसस्थानक परिसरात मोठी गर्दी झाली होती.

दोन-तीन दिवस सुरू असलेल्या मराठा आदोलनामुळे डिझेलचे टँकर पोहचलेले नाहीत. शनिवारी दुपारपर्यंत टँकर येणे अपेक्षित होते. मात्र तो न आल्याने नाईलाजास्तव फेऱया बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिर आहोत, मात्र यात एस. टी. प्रशासनाची कोणतीच चूक नाही.

अनिल मेहत्तर

विभाग नियंत्रक रत्नागिरी