|Saturday, February 23, 2019
You are here: Home » Top News » जातनिहाय आरक्षण बदलण्याचा विचार नाही-पंतप्रधान

जातनिहाय आरक्षण बदलण्याचा विचार नाही-पंतप्रधान 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशात वारंवार वादग्रस्त आणि चर्चेत राहिलेल्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केले आहे. यामध्ये आरक्षण, एनआरसी आणि जमावाकडून मारहाणीच्या घटना या बाबींचा समावेश आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. यावेळी जातनिहाय आरक्षण बदलण्याचा सरकारचा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एनआरसीच्या मुद्यावरुन कोणत्याही भारतीयाला देश सोडावा लागणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यावेळी जनतेशी संबोधित करतांना मोदी म्हणाले की, जातनिहाय आरक्षणात कोणताही बदल करण्याचा सरकारचा विचार नाही. त्यामुळे याबाबत कोणीही मनात शंका ठेऊ नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्ने हीच देशाची ताकद आहे. सबका साथ, सबका विकास या आमच्या उद्देशानुसार आंबेडकरांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. याद्वारे देशातील गरीब, पीडित, मागास, आदिवासी, दलित आणि ओबीसी समाजाचे हित जपणे आमच्यासाठी गरजेचे आहे. देशात सध्या जमावाकडून मारहाणीच्या ज्या घटना घडत आहेत त्या अत्यंत दुर्देवी आहेत. यावरुन कोणीही राजकारण करु नये सर्वांनी राजकारणाच्या पलिकडे जाऊन समाजात शांतता निर्माण करणे आवश्यक आहे. अशा मारहाणीच्या घटनांचे समर्थन होऊ शकत नाही, अशा शब्दांत मोदींनी आपली भुमिका स्पष्ट केली. आसामच्या राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत (एनआरसी) बोलताना मोदी म्हणाले, ज्या नागरिकांची नावे या यादीत नाहीत, त्यांना आपले नागरिकत्व सिद्ध करण्याची पूर्ण संधी दिली जाईल. त्यामुळे कोणत्याही भारतीय नागरिकाला देश सोडावा लागणार नाही. या मुद्यावरुन मोदींवर टीका करणाऱया ममता बॅनर्जींना उत्तर देताना ते म्हणाले, ज्या लोकांचा स्वतःवर विश्वास नाही, देशातील महत्वाच्या संस्थांवर त्यांना विश्वास नाही असेच लोक देशाचे तुकडे करण्याची भाषा करतात. देशातील बेरोजगारीच्या मुद्यावर बोलताना मोदी म्हणाले, गेल्या वषी 1 कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हे सांगताना त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा दाखला दिला आणि या योजनांमुळे रोजगार निर्माण झाले नाहीत का? असा सवाल त्यांनी या मुद्यावरुन वारंवार टार्गेट करणाऱया विरोधकांना विचारला आहे. दरम्यान, भाजपाला पराभूत करणे या एकमेव उद्देशाने तयार झालेली महाआघाडी फार काळ टिकू शकणार नाही, असेही मोदी यावेळी म्हणाले. ही महाआघाडी निवडणुकीआधी तुटते की नंतर हे पहावे लागणार आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी नव्हे तर व्यक्तिगत स्वार्थासाठी ही महाआघाडीची स्थापना करण्यात आल्याचा आरोप करताना विरोधकांना भाजपाशी एकट्याने लढण्याची हिंमत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Related posts: