|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » विद्यार्थी, शिक्षकांच्या हजेरीसाठी येणार ‘ऍप’

विद्यार्थी, शिक्षकांच्या हजेरीसाठी येणार ‘ऍप’ 

रेंज नसतानाही माहिती भरता येणार : तालुकापातळीवर होणार मुक्त संपर्क केंद्र

चंद्रशेखर देसाई / कणकवली:

शाळांमधील विद्यार्थ्यांची हजेरी सध्या सरलच्या माध्यमातून भरण्यात येते. यासाठी शाळांमध्ये इंटरनेट सुविधा नसल्यास, रेंज येत नसल्यास अडचणी निर्माण होतात. या साऱयांबाबत शिक्षकांमध्ये नाराजी असतानाच आता शिक्षण विभागाकडून या हजेरीसाठी ऍप उपलब्ध करण्यात येणार आहे. या ऍपच्या माध्यमातून वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांची हजेरी भरल्यानंतर त्या शिक्षकांचीही उपस्थिती आपोआपच नोंद होणार आहे. यासाठी रेंजची आवश्यकता नसून रेंजमध्ये आल्यानंतर या ऍपमध्ये नोंदविलेली माहिती सरलच्या आपल्या यूडायसमध्ये आपोआप नोंद होणार आहे. तसेच शाळाबाहय़ विद्यार्थ्यांसाठी तालुक्याच्या ठिकाणी मुक्त संपर्क केंद्र सुरू करण्याचाही प्रयत्न असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती सध्या सरलच्या माध्यमातून ऑनलाईन नोंद करण्याची कार्यवाही करण्यासंदर्भात आदेश दिलेले होते. मात्र, ही नोंद करण्यासाठी शाळा पातळीवर सध्या इंटरनेट असल्याने, असल्यास व्यवस्थित रेंज मिळत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागणार. त्यामुळे संघटनापातळीवर या कार्यवाहीला यापूर्वी जोरदार विरोध झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी याबाबत देण्यात आलेल्या आदेशाची नंतर अंमलबजावणी झाली नाही.

स्वतंत्र ऍप येणार

या पार्श्वभूमीवर ऑनलाईन हजेरीची नोंद करण्यासाठी काय करता येईल, याबाबत शासनस्तरावर विचार सुरू होता. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता यासाठी लवकरच स्वतंत्र ऍप विकसित करण्यात येणार आहे. राज्यपातळीवर याबाबतचा डेमोही झाला. या ऍपनुसार वर्गशिक्षकांनी सर्व माहिती ऑनलाईन ऍपवर प्रथम भरायची आहे. त्यानंतर वर्गशिक्षकांनी नियमितपणे हजेरी घेतल्यानंतर विद्यार्थी हजेरी ऑनलाईन ऍपवर भरायची. अशी माहिती भरली, की विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही उपस्थिती ऑनलाईन उपलब्ध होते. वर्गशिक्षक गैरहजर असतील, तर मुख्याध्यापकांनी हजेरी घ्यायची आहे. अशावेळी वर्गशिक्षकांच्या रजेची नोंदही आपोआपच ऑनलाईनला होते. ही माहिती भरण्यासाठी रेंजची आवश्यकता नाही. ज्यावेळी संबंधीत शिक्षक रेंजमध्ये येतील, त्यावेळी सरलच्या यूडायसमध्ये याबाबतची आपोआपच नोंद होते व उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थितीही उपलब्ध होते.

मुक्त संपर्क केंद्र

प्रत्येक तालुक्यात तालुक्याच्या ठिकाणी मुक्तसंपर्क केंद्र सुरू करण्यात येणार आहे. ही मुक्त संपर्क केंद्रे पाचवी, आठवी, दहावी व बारावीसाठी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे सुत्रांनी सांगितले. या केंद्रात जे विद्यार्थी कधीच शाळेत गेलेले नाहीत, त्यांना 5, 8, 10, 12 वयोगटानुसार प्रवेश देण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंदणी करून प्रवेश देण्याचेही प्रस्तावीत आहे. अप्रगत विद्यार्थ्यांनाही या मुक्त संपर्क केंद्रात प्रवेश देण्याच्या अनुषंगाने निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले. येथे आपली पाठय़पुस्तके, पूर्वतयारी पुस्तके, स्वयंअध्ययन पुस्तिका असणार आहे. यासाठी जि. प. शाळा, खासगी संस्था ऑनलाईन नोंदणी करू शकतात. किमान 50 व जास्तीत जास्त 100 विद्यार्थी एका केंदात असणार आहेत. येथे नोव्हेंबर व एप्रिल अशा दोनवेळा परीक्षा होणार आहेत. गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी पाहणी करून या केंद्रांना मान्यता देणार आहेत.

दहावी प्रश्नपत्रिकेत बदल?

पुढील वर्षापासून दहावीच्या प्रश्नपत्रिकेतही बदल करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही होण्याची शक्यता आहे. राज्याचा दहावीचा निकाल चांगला असला, तरीही देशपातळीवर विचार केल्यास 75 टक्के गुण घेणाऱया महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची टक्केवारी केवळ एक टक्का आहे. यासाठी यावर्षी एनसीईआरटीमार्फत माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्याबाबतही कार्यवाही होणार आहे. सर्व पर्यवेक्षिय यंत्रणेस गुणवत्तेवर अधिक भर देण्याच्या सूचना असून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक गुणवत्ता पाहण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. 31 जुलैपर्यंत केंद्रप्रमुखांनी सर्व माहिती भरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Related posts: