|Saturday, July 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » संत बाळूमामांचे चरित्र आता छोटय़ा पडद्यावर

संत बाळूमामांचे चरित्र आता छोटय़ा पडद्यावर 

जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे असं म्हणतात. प्रत्येक माणसाला आयुष्यात कधी ना कधी मार्गदर्शनाची आणि पाठिंब्याची आवश्यकता भासते. विशेषत: संकटकाळी काय करावे, कोणता निर्णय घ्यावा असा प्रश्न बऱयाचदा पडतो. कधी कधी दिशाहीन झाल्यासारखे वाटते अशा परिस्थितीत आपण परमेश्वराचे नामस्मरण करतो. लोकपरोपकारार्थ आणि भक्तांचे कल्याण करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचलेल्या श्री सद्गुरु संत बाळूमामा यांचे चरित्र आणि त्यांच्यातील दैवत्वाची प्रचिती लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. कलर्स मराठीवर संत बाळूमामा यांचे जीवन चरित्र पाहायला मिळणार आहे. बालमूर्तीच्या मंगल चरित्राचा आरंभ : बाळूमामाच्या नावानं चांगभलं 13 ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होणार आहे. संतोष अयाचित लिखीत या मालिकेची निर्मिती साजरी क्रिएटीव्हज यांनी केली आहे.

अकोळ या गावामधील धनगर समाजातील एका कुटुंबामध्ये बाळूमामांचा जन्म झाला. बाळूमामांची आई विठ्ठलभक्त होती. बाळूमामांच्या जन्माआधीपासूनच त्यांच्या आईला हे सत्य उमगले होते की त्यांच्या उदरामध्ये वाढणारे बाळ हे असाधारण आहे. याच गावामध्ये देवऋषी यांचा मोठा धाक होता. या देवऋषीचे एकच ध्येय होते आणि ते म्हणजे कुठल्याही प्रकारे देवपण मिळवणे. तर दुसऱया बाजूला बाळूमामा होते ज्यांनी लहानपणापासूनच गरजू लोकांना मदत केली आणि त्यांच्या शक्तीची प्रचिती हळूहळू लोकांना येत गेली. या सगळय़ा प्रवासामध्ये बाळूमामांची आई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. आई सुंदराने बाळूमामांना कसे घडवले? आईबरोबर बाळूमामांचे नातं कसं होतं? देवऋषी आणि बाळूमामा यांमधील संघर्ष कसा होता हे सगळं प्रेक्षकांना या मालिकेमध्ये बघयाला मिळणार आहे.

  मालिकेचे दिग्दर्शक संतोष अयाचित म्हणाले, महाराष्ट्रात असंख्य गोष्टी दडलेल्या आहेत आणि त्या सर्वांपर्यंत पोहचलेल्या नाहीत त्यातलाच एक भाग म्हणजे बाळूमामा…. या विभूतींचे व्यक्तिमत्व आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य… 1892 साली जन्मलेले बाळूमामा महाराष्ट्र आणि कर्नाटकात त्यांच्या मेंढरासोबत ऊन, वारा, पाउस, झेलत पायी फिरले. असंख्य जाती धर्माच्या माणसांना भेटत त्यांची आयुष्य बाळूमामांनी बदलून टाकली. हे इतकं प्रचंड कार्य एका महाकाव्यसारखं आहे. वेगळा काळ, वेगळी पात्रं असलेली ही अलौकिक गोष्ट कलर्स मराठीवर मालिकेच्या माध्यमातून घेऊन येत आहोत. वाट चुकलेल्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि त्यांच्या शंकेचे निरसन करणारा अवलिया म्हणजेच थोर संत बाळूमामा. बाळूमामांचे हजारो अनुयायी त्यांच्यापुढे आजही नतमस्तक होतात. बाळूमामांच्या मेंढय़ाचे कळप अतिशय शुभ मानले जातात. त्यांच्या देवस्थानी त्यांचे अनेक भक्त त्यांच्या समस्यांचे निरसन करण्यासाठी जातात. तुम्ही माझ्याकडे येऊ नका मी तुमच्याकडे येतो असं सांगून हजारो लोकांना आधार देणाऱया असाधारण माणसाचे म्हणजे संत बाळूमामांचे चरित्र या मालिकेद्वारे प्रेक्षकांना बघण्याची संधी मिळणार आहे.