|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » लैंगिक शोषणाविरोधात ‘मी टू’

लैंगिक शोषणाविरोधात ‘मी टू’ 

‘अन्यायरहित जिंदगी’ संस्थेची मोहीम

प्रतिनिधी / सावंतवाडी:

“माझा नवरा दारुडा होता. तो रोज दारू पिऊन मारझोड करायचा. एक दिवस मी घरातून पळाले. कुठे जायचे ते ठरवले नव्हते. बस फक्त रोजच्या मारझोडीपासून दूर. मी रेल्वे स्टेशनवर उदासपणे बसले होते. तिथे एक अनोळखी स्त्राr आणि पुरुष माझ्याजवळ आले. त्यांनी माझी आस्थेने चौकशी केली. मीदेखील त्यांच्यासमोर माझे मन मोकळे केले. त्यांनी मला काम मिळवून देण्याची आशा दाखवली. मी त्यांच्यासोबत गेले. त्यांनी मला खायला दिले. त्यांनी दिलेले खाताच मला गुंगी आली. शुद्ध आली तेव्हा रक्त येत होते. मी वेश्यावस्तीत कायमची पोहोचले होते.’

‘अन्यायरहित जिंदगी’ (एआरझेड) या सामाजिक संस्थेने वेश्या व्यवसायात  ढकलल्या गेलेल्या युवती, महिलांचे विश्व चार डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून समोर आणले आहे. ‘मी टू’ कॅम्पेन अंतर्गत ‘मंडी’ या डॉक्युमेंटरीतील वास्तव भयानक आहे.

ती सांगते, ‘या धंद्यात कोणी स्वेच्छेने येत नाही. फसवून आणले जाते. लोक जेव्हा म्हणतात की, आम्ही पैशासाठी धंदा करतो. मजेसाठी धंदा करतो, तेव्हा खूप वाईट वाटते. आम्हाला दोष देणाऱयांचा खूप संताप येतो.’

‘मला जेव्हा धंद्यात आणले गेले तेव्हा मी चौदा वर्षांची होते. मला खोलीत कोंडून ठेवले जाई. गिऱहाईक येऊन जबरदस्ती करे.’

‘माझा मुलगा खेळताना वरून पडला. त्याला प्रॅक्चर झाले. डॉक्टरने उपचारासाठी दहा हजार रुपये खर्च सांगितला. गरिबाच्या हातात एवढे पैसे कुठून असणार? शेजारी एक आन्टी राहायची. मी तिच्याकडे पैशांची मदत मागितली. ती मला दुसऱया एका माणसाकडे घेऊन गेली. त्याने पैशाच्या बदल्यात माझा देह मागितला. माझ्यासाठी हा धक्का होता. पण मी असहाय्य होते. पोटच्या पोराला उपचाराविना मी कसे मरू दिले असते?’

आत्मकथने प्रकाशित

वेश्या व्यवसायात गुंतलेल्या मुलींच्या कहाण्या अशा विदिर्ण करणाऱया आहेत. अलिकडेच वास्को-गोवा येथील अर्ज या संस्थेने ‘मंडी’ या सीडीद्वारे त्यांची आत्मकथने त्यांच्याच आवाजात प्रकाशित केली आहेत. या सीडीचे चार भाग आहेत. त्यातील ‘असहाय्य’ या पहिल्या सीडीत आपण देहविक्रयात कसे गुंतवलो गेलो, हे त्या सांगत आहेत.

संघटित गुन्हेगारी

वेश्या व्यवसायात असलेल्या मुलींबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. त्या मुली काम करायचे नाही म्हणून, पैसे मिळविण्याचा सोपा मार्ग म्हणून, मौजमजा करण्यासाठी किंवा लैंगिक भूक अधिक असल्यामुळे येतात, असे भ्रम आहेत. हे सर्व पूर्णपणे खोटे असून एक संघटित गुन्हेगारी रचना या मुलींच्या मजबुरीचा पद्धतशीरपणे फायदा उठवत त्यांना देहविक्रीच्या बाजारातील वस्तू बनवत असते.

या डॉक्युमेंटरीमधून युवतींचे होणाऱया लैंगिक शोषणाचे, विशेषत: गोवा, दिल्ली, मुंबई, कोलकता भागातील चित्र आहे. ‘हेल्पलेस’, ‘कमोडिटी’, ‘गैरसमज’ आणि ‘बाहेर पडण्याचा मार्ग’ अशा चार भागात ‘मंडी’तून शोषणाचे वास्तव समोर आणले आहे. या डॉक्युमेंटरीत असलेले हे या मुलींचे वैयक्तिक बोल आहेत. अर्ज संस्थेने घेतलेल्या राष्ट्रीय परिषदेत त्यांनी ते व्यक्त केले.

बांदा येथील मानसोपचारतज्ञ डॉ. रुपेश पाटकर, त्यांचे सहकारी दशरथ मोरजकर, पराग गावकर यांनी युवतींच्या शोषणाविरोधात आवाज उठविण्याच्या ‘अर्ज’ संस्थेच्या ‘मी टू’ मोहिमेत सहभाग दर्शविला.

Related posts: