|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कसईनाथ, तेरवणमेढे गजबजणार

कसईनाथ, तेरवणमेढे गजबजणार 

श्रावणी सोमवार : पर्यटनस्थळ म्हणूनही ख्याती

प्रतिनिधी / दोडामार्ग:

श्रावणमासातील पहिल्या सोमवारी भाविक श्री शंकराच्या चरणी लिन होतात. तालुक्यात श्रावण मासात गजबजणारी व भक्तांची श्रद्धास्थाने म्हणजे कसईनाथ डोंगर व तेरवणमेढे येथील श्री नागनाथ देवस्थान. पहिल्या श्रावणी सोमवारपासून इथे भक्तांची मांदियाळी दिसणार आहे.

दोडामार्ग तालुक्यातील कसईनाथ डोंगर येथे धार्मिक अधिष्ठान आहे. महत्त्वाचे म्हणजे येथे जाण्यासाठी रस्ता नाही. येथील आंबेली गावातून डोंगरापर्यंत अंतर पायी पार करत तिथे जावे लागते. महत्वाचे म्हणजे श्रावणी सोमवारी येथे वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. तर तेरवण-मेढे येथील नागनाथ मंदिरात महाशिवरात्र हा उत्सव मोठय़ा प्रमाणात होतो. शिवाय दर सोमवारी अभिषेक करण्यासाठी गर्दी असतेच. मात्र, श्रावण महिन्यात या गर्दीचे प्रमाण अधिक असते.

कसईनाथ भक्तांचा पाठीराखा

वेगवेगळय़ा ठिकाणाहून वेगवेगळय़ा रुपात समोर येणारा कसईनाथ भाविक व पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. कसईनाथ हा डोंगर असला तरी तो कसई-दोडामार्ग शहरवासीयांसोबत समस्त तालुकावासीयांचा पाठीराखा आहे. दोडामार्ग तिलारी रस्त्यावरून जाताना आकाशाला स्पर्श करू पाहणारा टोलेजंग कसईनाथ दृष्टीस पडतो. पावसाळय़ात कसईनाथचे सौंदर्य अधिकच खुलते. कसईनाथ हे धार्मिक व पर्यटनस्थळ म्हणून परिचित आहे. श्रावण महिन्यात कसईनाथ गर्दीने फुलून जातो. कसईनाथच्या शिरोभागी पांडवकालीन मंदिराचे अवशेष आहेत. तिथपर्यंत भक्त पायी पोहोचतात. आंबेली येथून हा पायी मार्ग आहे.

गंगास्नानाचे समाधान देणारे नागनाथ देवस्थान

महाशिवरात्रीसाठी प्रसिद्ध असणाऱया तेरवण मेढे येथील नागनाथ देवस्थान श्रावण महिन्यातही विशेष महत्वाचे आहे. पांडवकालीन श्री नागनाथ देवस्थान हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गंगास्नानाचे समाधान देणाऱया नागनाथ देवस्थान येथे श्रावण महिन्यात धार्मिक विधी, अभिषेक यासाठी भक्त गर्दी करतात.

Related posts: