|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » नवे अर्थशास्त्रच विषमता दूर करेल

नवे अर्थशास्त्रच विषमता दूर करेल 

प्राचार्य आनंद मेणसे यांचे प्रतिपादन : संत परंपरा आणि अर्थव्यवस्थेची सांगड हवी! : ‘रिंगण’च्या संत गोरा कुंभार विशेषांकाचे प्रकाशन

80 टक्के संपत्ती 20 टक्के लोकांच्या हाती असल्याने विषमता-मेणसे

वार्ताहर / सावंतवाडी:

आपल्या देशातील संत परंपरा आणि जागतिक अर्थव्यवस्था या दोहोंची सांगड घालून नवे अर्थशास्त्र आत्मसात करायला हवे. आपल्या देशातील 80 टक्के संपत्ती 20 टक्के लोकांच्या हातात आहे. 80 टक्के लोक 20 टक्के संपत्तीवर अवलंबून आहेत. हीच खरी विषमता असून यातून आरक्षणाचे प्रश्न निर्माण होत आहेत. ज्यांच्या हाती 80 टक्के संपत्ती आहे, त्यांच्या विरोधात भांडण्याचा कोणता मार्ग आहे, तो समजून घ्यायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य आनंद मेणसे यांनी व्यक्त केले.

येथील श्रीराम वाचन मंदिरात संतपरंपरेचा सामाजिक व सांस्कृतिक दृष्टीने मागोवा घेणाऱया वार्षिक रिंगण प्रकाशन सोहळा व चर्चासत्र सत्यशोधक मनोहर कदम प्रागतिक संशोधन केंद्र आणि श्रीराम वाचन मंदिरतर्फे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेणसे होते. यावेळी प्रमुख वक्ते सत्यशोधक जनआंदोलनाचे अध्यक्ष किशोर जाधव, ‘रिंगण’चे संपादक, पत्रकार सचिन परब, कुंभार समाज संघटनेचे विलास गुडेकर, कष्टकरी चळवळीचे नेते संपत देसाई, डॉ. जी. ए. बुवा आदी उपस्थित होते.

मेणसे पुढे म्हणाले, आपल्या देशाला बसवेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत गोरा कुंभार अशी मोठी संत परंपरा आहे. ही संत चळवळ व्यापक व्हायला हवी. आज वारीत लाखो लोक सहभागी होत आहेत. मग संत चळवळ म्हणावी तशी व्यापक का होत नाही, असा प्रश्न पडतो. संत चळवळ व अर्थशास्त्राची सांगड घातली गेली तर खऱयाअर्थाने बदल घडून येईल. जागतिक अर्थव्यवस्थेमुळे आज अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. या अर्थव्यवस्थेला संत परंपरेची जोड दिली तर नवे अर्थशास्त्र निर्माण होईल. यातून जातीय विषमतेची दरी कमी होण्यास मदत होईल. आज 80 टक्के संपत्ती 20 टक्के लोकांच्या हातात असल्याने विषमता आणि जातीयता निर्माण झाली आहे. 80 टक्के संपत्तीचे अर्थशास्त्र समजून घेण्याची वेळ आली आहे. आपला देश 2020 मध्ये महासत्ता बनेल, असे सांगितले जात आहे. दुसरीकडे आपला देश जगाच्या सर्वेक्षणात 137 व्या नंबरवर आहे. जर अशी अवस्था असेल तर आपण महासत्ता कसे बनू, असा सवालही मेणसे यांनी केला.

यावेळी प्रमुख वक्ते किशोर जाधव म्हणाले, संत साहित्याची परंपरा मोठी आहे आणि ही परंपरा जाणण्याची गरज आहे. संत परंपरा आणि वारकरी सांप्रदाय यांच्यामध्ये वैदिक परंपरा घुसडली जात आहे आणि यातून समाजाचा समतोल बिघडत आहे. वैदिक परंपरेतून ब्राह्मणांनी जाती विषमताच निर्माण केली.

यावेळी ‘रिंगण’चे संपादक सचिन परब यांनी ‘संत परंपरा आणि आजची स्थिती’ यावर मार्गदर्शन केले. तसेच ‘रिंगण’ची निर्मिती प्रक्रिया सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश कदम, प्रास्ताविक मधुकर मातोंडकर यांनी केले. यावेळी राजेंद्र कांबळे, महेश पेडणेकर, वाय. पी. नाईक, प्रा. जी. एम. शिरोडकर, विठ्ठल कदम, आर. के. संकपाळ, हरिहर वाटवे आदी उपस्थित होते.