|Saturday, July 20, 2019
You are here: Home » क्रिडा » नादाल-तेस्तिपास रंगणार फायनल

नादाल-तेस्तिपास रंगणार फायनल 

वृत्तसंस्था/ टोरांटो

येथे सुरु असलेल्या रॉजर्स चषक टेनिस स्पर्धेत स्पेनचा राफेल नादाल व ग्रीकचा स्टीफेनोस तेस्तिपास यांनी शानदार विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला. आज, प्रेंच ओपन चॅम्पियन नादालसमोर जेतेपदासाठी ग्रीकच्या युवा तेस्तिपासचे आव्हान असेल. महिलांत रोमानियाची सिमोना हॅलेप व अमेरिकेची स्लोनी स्टीफेन्स यांच्यात अंतिम लढत होईल. 

शनिवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य लढतीत अग्रमानांकित राफेल नादालने रशियाच्या कॅचनोव्हचा 7-6, 6-4 असा पराभव केला व अंतिम फेरी गाठली. विशेष म्हणजे, रशियाच्या युवा कॅचनोव्हने दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करताना स्पेनच्या या दिग्गज टेनिसपटूला चांगलीच टक्कर दिली. आता, अंतिम लढतीत नादालसमोर ग्रीकच्या तेस्तिपासचे आव्हान असणार आहे. रॉजर्स चषक स्पर्धेच्या उपांत्य लढतीत नादालविरुद्ध खेळण्याचा अनुभव हा अविस्मरणीय होता, अशी प्रतिक्रिया सामन्यानंतर रशियन कॅचनोव्हने दिली.

दुसऱया उपांत्य लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या सहाव्या मानांकित केविन अँडरसनला मात्र धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. ग्रीकच्या नवोदित तेस्तिपासने अँडरसनला 6-7, 6-4, 7-6 असे पराभूत करत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. या संघर्षमय लढतीत अनुभवी अँडरसनला ग्रीकच्या तेस्तिपासने जोरदार टक्कर देत अंतिम फेरी गाठली.

महिलांत हॅलेप-स्टीफेन्स रंगणार फायनल

रॉजर्स चषक स्पर्धेच्या महिला एकेरीत रोमानियाच्या सिमोना हॅलेपने विजयी आगेकूच कायम ठेवताना अंतिम फेरीत प्रवेश केला. हॅलेपने फ्रान्सच्या कॅरोलिन गार्कीवर 7-5, 6-1 असा विजय मिळवला. आता, अंतिम फेरीत अग्रमानांकित हॅलेपसमोर अमेरिकेच्या स्लोनी स्टीफेन्सचे आव्हान असणार आहे. याशिवाय, दुसऱया एका लढतीत अमेरिकन स्टीफेन्सने युक्रेनची दिग्गज खेळाडू एलिन स्विटोलिनाला 6-3, 6-3 असे नमवले. या अंतिम लढतीत स्विटोलिनाकडून मोक्याच्या क्षणी चुका झाल्यामुळे पराभवाचा सामना करावा लागला.