|Monday, July 22, 2019
You are here: Home » क्रिडा » इंडोनेशियात दोन पदके जिंकण्याचा अभिषेक वर्माचा विश्वास

इंडोनेशियात दोन पदके जिंकण्याचा अभिषेक वर्माचा विश्वास 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताचा अव्वल तिरंदाज अभिषेक वर्माने इंडोनेशियात होणाऱया आशियाई क्रीडा स्पर्धेत किमान दोन पदके मिळविण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. मागील वेळीही त्याने दोन पदके मिळविली होती. मात्र या वेळी कंपाऊंड विभागात वैयक्तिक स्पर्धा ठेवण्यात आलेली नाही.

29 वषीय वर्माने 2014 मध्ये इंचेऑनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक गटात एक व सांघिक गटात एक अशी दोन पदके मिळविली होती. त्यावेळी भारतीय तिरंदाजांनी एकूण चार पदके मिळविली होती आणि ती सर्व कंपाऊंड विभागातील होती. रिकर्व्हमध्ये भारताला एकही पदक जिंकता आले नव्हते. वर्माने वर्ल्डकपमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली असून एका वर्ल्डकप फायनलमध्ये रौप्यपदक मिळविले आहे. 18 ऑगस्टपासून सुरू होणाऱया आशियाई स्पर्धेत तोच भारताचा संभाव्य पदकविजेता मानला जात आहे. तो या स्पर्धेत सांघिक तसेच मिश्र दुहेरी विभागात भाग घेणार आहे.

‘कंपाऊंडमध्ये वैयक्तिक प्रकार ठेवण्यात आलेला नाही. पण तो भाग घेतलेल्या सर्वांसाठीच आहे. त्याऐवजी मिश्र दुहेरी प्रकार समाविष्ट करण्यात आला असल्याने त्यातही दोन पदके मिळविण्याची मला संधी आहे,’ असे वर्मा म्हणाला. सोनपत येथे तो सध्या सराव करीत आहे. ‘सर्व तीनही विभागात (पुरुष व महिला सांघिक आणि मिश्र दुहेरी) भारताला पदके मिळतील याची खात्री वाटते. मात्र पदकाचा रंग कोणता असेल याचे आताच भाकीत करणे कठीण आहे. तो दिवस व त्यावेळची स्थिती यावर ते अवलंबून असेल,’ असे तो म्हणाला. सांघिक विभागात भारत विद्यमान चॅम्पियन आहे, याबाबत वर्मा म्हणाला की, ‘आमच्यावर त्याचे कोणतेही दडपण असणार नाही. आम्ही फक्त सांघिक व मिश्र दुहेरी अशी दोन्ही पदके जिंकण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. स्पर्धेत सहभागी झालेले सर्वच संघ बलाढय़ असून आम्ही त्यांना जोरदार संघर्ष करायला भाग पाडणार आहोत.’.

2014 मध्ये रिकर्व्ह विभागात भारताला रिकाम्या हाताने परतावे लागले होते. त्याआधी गुआंगझेयू येथे 2010 मध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने या विभागात तीन पदके जिंकली होती. त्यात तरुणदीप रायच्या रौप्यपदकाचा समावेश होता. पुरुषांच्या रिकर्व्ह संघाला सर्वात मोठा फटका बसला असून 2010-11 अग्रस्थानावर असणारा हा संघ आता 12 व्या क्रमांकापर्यंत घसरला आहे. मात्र वर्माने रिकर्व्ह संघालाही पाठिंबा दिला असून तेही किमान तीन पदके जिंकतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. ‘त्यांनी मागील एकही पदक जिंकले नसले तरी आम्ही एकूण चार पदके मिळविली होती. मात्र इंडोनेशियातील स्पर्धेत कंपाऊंडमध्ये तीन व रिकर्व्हमध्ये तीन पदके आम्ही निश्चितपणे जिंकू, याची मला खात्री वाटते. सर्व पदके जिंकण्याचा पराक्रमही भारताने केला आहे, ते दिवस लवकरच पुन्हा परततील, अशी आशा वाटते,’ असे तो म्हणाला. मी या संघाचे नेतृत्व करीत असून ज्युनियर-सिनियर असा कोणताही भेदभाव नसेल, फक्त सांघिक प्रयत्नावर आमचा भर असेल. त्या दिवसाच्या परिस्थितीनुसार आम्ही खेळाडूंचा क्रम ठरवणार आहोत, असेही त्याने संघातल्या आपल्या भूमिकाबद्दल बोलताना सांगितले.