|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » क्रिडा » इंग्लंडचा एक डाव 159 धावांनी विजय

इंग्लंडचा एक डाव 159 धावांनी विजय 

मालिकेत यजमानांची 2-0 ने आघाडी, अष्टपैलू वोक्स सामनावीर,

लॉर्ड्स

दुसऱया कसोटीच्या चौथ्या दिवशीच इंग्लंडने भारताचा एक डाव 159 धावांनी दणदणीत पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.  या डावात स्टुअर्ट ब्रॉड व अँडरसन यांनी प्रत्येकी 4 बळी घेत इंग्लंडचा मोठा विजय साकार केला. पहिल्या डावाप्रमाणे या डावातही रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक धावा जमविताना नाबाद 33 धावा केल्या. नाबाद 137 व चार बळी मिळविणाऱया वोक्सला सामनावीराचा बहुमान मिळाला.

इंग्लंडने चौथ्या दिवशी पहिला डाव 7 बाद 396 धावांवर घोषित करुन भारतावर 289 धावांची भक्कम आघाडी मिळविली. त्यानंतर अँडरसन, ब्रॉड व ख्रिस वोक्स यांच्या भेदक माऱयासमोर भारताचा दुसरा डाव 47 षटकांत 130 धावांत गुंडाळून डावाने विजय साकार केला. अँडरसनने बळींचा सिलसिला सुरू केल्यानंतर ब्रॉडने 4 बळी टिपत भारताची स्थिती 6 बाद 61 अशी केली. शंभर धावांच्या आतच डाव गुंडाळला जाणार असे वाटत असतानाच हार्दिक व अश्विन यांनी थोडाफार प्रतिकार करीत सातव्या गडय़ासाठी 55 धावांची भागीदारी करीत संघाला शतकी मजल मारून दिली. हार्दिकला वोक्सने पायचीत करून ही जोडी फोडली. हार्दिकने 43 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 26 धावा केल्या. ही जोडी फुटल्यानंतर भारताचा डाव फारवेळ लांबला नाही. 47 षटकाच्या शेवटच्या चेंडूवर वोक्सने इशांत शर्माला लेगगलीमध्ये पोपकरवी झेलबाद करून भारताचा डाव 130 धावांत संपुष्टात आणला. अश्विन 33 धावांवर नाबाद राहिला. त्याने 48 चेंडूत 5 चौकार मारले. ब्रॉडने 44 धावांत 4 तर अँडरसनने 23 धावांत 4 आणि वोक्सने 24 धावांत 2 बळी मिळविले. करनने 9 षटके टाकली तर रशिदला गोलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही. तिसरी कसोटी नॉटिंगहॅम येथे 18 ऑगस्टपासून सुरू होईल.

इंग्लंडची डावाची घोषणा

इंग्लंडने चौथ्या दिवशी 6 बाद 357 या धावसंख्येवरून खेळास सुरुवात केली आणि आदल्या दिवशीची नाबाद जोडी सॅम करन व शतकवीर ख्रिस वोक्स यांनी आणखी 39 धावांची भर घातल्यानंतर करनला हार्दिक पंडय़ाने थर्डमॅनवरील मोहम्मद शमीकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. करनने जलद धावा जमविताना 49 चेंडूत 5 चौकार, एका षटकाराच्या मदतीने 40 धावा जमविल्या आणि वोक्ससमवेत सातव्या गडय़ासाठी 76 धावांची भागीदारी केली. तो बाद झाल्यानंतर रूटने पहिला डाव घोषित केला. यावेळी इंग्लंडला 289 धावांची भक्कम आघाडी मिळाली होती. पहिले शतक नोंदवणारा वोक्स 137 धावांवर नाबाद राहिला. त्याने 177 चेंडूंच्या खेळीत 21 चौकार मारले. भारतातर्फे शमी व हार्दिक पंडय़ा यांनी प्रत्येकी 3 बळी टिपले तर इशांत शर्माने 1 बळी मिळविला. अश्विन व कुलदीप यादव यांना एकही बळी मिळविता आला नाही.

आघाडीवीर पुन्हा अपयशी

पहिल्या डावाप्रमाणे दुसऱया डावातही भारताची खराब सुरुवात झाली. पहिल्या डावात भारताचा कर्दनकाळ ठरलेल्या अँडरसनने मुरली विजयला शून्यावरच यष्टिरक्षकाकरवी झेलबाद केले. त्यानंतर लोकेश राहुलला 10 धावांवर पायचीत करून भारताची स्थिती 2 बाद 13 अशी केली. नंतर अँडरसनचा सहकारी स्टुअर्ट ब्रॉडने वातावरणचा अचूक लाभ उठवित चहापानापर्यंत एकूण चार बळी आपल्या नावावर नोंदवले होते. पावसाचा व्यत्यय आल्याने उपाहार लवकर घेण्यात आले त्यावेळी भारताने 2 बाद 17 धावा जमविल्या होत्या. उपाहारानंतरच्या सत्रात पुजारा व रहाणे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ब्रॉडने एका अप्रतिम आऊटस्विंगवर रहाणेला स्लिपमधील जेनिंग्सकडे झेल देण्यास भाग पाडून ही जोडी फोडली. रहाणेने 33 चेंडूत 2 चौकारांसह 13 धावा केल्या. पाठदुखीमुळे चौथ्या क्रमांकावर आलेल्या कोहलीने पुजारासमवेत हळूहळू डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. पण पुजाराला ब्रॉडने एका उत्कृष्ट इनस्विंगवर त्रिफळाचीत करीत भारताला आणखी एक धक्का दिला. पुजाराने 87 चेंडूत केवळ एक चौकार मारत 17 धावा काढल्या. ब्रॉडने नंतर व्यवस्थित सापळा रचत कोहलीचा बळी मिळवित भारताच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आणल्या. ब्रॉडने पुढच्याच चेंडूवर दिनेश कार्तिकला पहिल्याच चेंडूवर पायचीत करीत भारताची 6 बाद 61 अशी केविलवाणी स्थिती केली. कोहलीने 29 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 17 धावा काढल्या. आणखी षटक झाल्यानंतर पावसास सुरुवात झाल्याने चहापान लवकर उरकण्याचा निर्णय पंचांनी घेतला. यावेळी भारताने 32 षटकांत 6 बाद 66 धावा जमविल्या होत्या आणि डावाचा पराभव टाळण्यासाठी अजून 223 धावांची गरज होती. यावेळी अश्विन 0 व हार्दिक 1 धावेवर खेळत होता.

धावफलक

भारत प.डव 107, इंग्लंड प.डाव 88.1 षटकांत 7 बाद 398 : कूक 21 (25 चेंडूत 4 चौकार), जेनिंग्स 11 (22 चेंडू), रूट 19 (53 चेंडूत 2 चौकार), पोत 28 (38 चेंडूत 3 चौकार), बेअरस्टो 93 (144 चेंडूत 12 चौकार), बटलर 24 (22 चेंडूत 4 चौकार), वोक्स नाबाद 137 (177 चेंडूत 21 चौकार), करन 40 (49 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), अवांतर 23, इशांत 1-101, शमी 3-96, हार्दिक पंडय़ा 3-66.

भारत दु.डाव : मुरली विजय झे. बेअरस्टो गो. अँडरसन 0, राहुल पायचीत गो. अँडरसन 10 (16 चेंडूत 2 चौकार), पुजारा त्रि.गो. ब्रॉड 17 (87 चेंडूत 1 चौकार), रहाणे झे. जेनिंग्स गो. ब्रॉड 13 (33 चेंडूत 2 चौकार), कोहली झे. पोप गो. ब्रॉड 17 (29 चेंडूत 2 चौकार), हार्दिक पायचीत गो. वोक्स 26 (43 चेंडूत 5 चौकार),, कार्तिक पायचीत गो. ब्रॉड 0 (1 चेंडू), अश्विन नाबाद 33 (48 चेंडूत 5 चौकार), कुलदीप यादव त्रि.गो. अँडरसन 0 (7 चेंडू), शमी पायचीत गो. अँडरसन 0 (3 चेंडू), इशांत शर्मा झे. पोप गो. वोक्स 2 (7 चेंडू),, अवांतर 12, एकूण 47 षटकांत सर्व बाद 130.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-0, 2-13, 3-35, 4-50, 5-61, 6-61, 7-116, 8-121ण् 9-125, 10-130.

गोलंदाजी : अँडरसन 12-5-23-4, ब्रॉड 16-6-44-4, वोक्स 10-2-24-2, करन 9-1-27-0.