|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » महाड तालुक्यात अवैध कत्तलखान्यावर छापा

महाड तालुक्यात अवैध कत्तलखान्यावर छापा 

प्रतिनिधी / महाड

महाड तालुक्यांतील विन्हेरे विभागांमध्ये असलेल्या भोमजाई मोहल्ला येथील एका गोठय़ांत सुरु असलेला बेकायदेशीर कत्तलखाना पोलिसांनी उध्दवस्त केला. साडे पाचशे किलो गुरांचे मास, सात जीवंत गुरे, दोन वाहने असा सुमारे 10 लाखाचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाने सातजणांना अटक केली आहे.

महाड तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून गुरांची अवैध कत्तल करुन बेकायदेशीर मांस विक्री करण्यात येत असल्याचे उघड झाल्यानंतर तालुक्यांतील दुर्गम भागाते असलेल्या भोमजाई गावातील मोहल्यातील एका गोठय़ामध्ये बेकायदेशीर गुरांची कत्तल करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. या माहितीची दखल त्वरीत घेण्यात येऊन भोमजाई मोहल्यांतील गोठय़ावर रविवारी पहाटेच्या सुमाराला छापा मारण्यात आला. यावेळी गोठय़ाचा मालक हमिद महालदार याच्यासह चौघेजण गुरांची कत्तल करत असताना रंगेहाथ सापडले. त्याच बरोबर साडेपाचशे किलो गुरांचे मास सापडले. तसेच कत्तलीसाठी चोरलेले बैल व वासरे अशी 7 जीवंत गुरे सापडली. हे मांस परस्पर विकण्यासाठी नेण्यात येणार होते. मांसाची वाहातूक करण्यासाठी असलेला एक टेम्पो आणि एक कार देखील पोलिसांनी जप्त केली. कारमध्ये कत्तल करण्यासाठी लागणारी हत्यारे देखील सापडली आहेत. या प्रकरणीची अधिक चौकशी पोलीस अधिक्षक करत आहेत. या प्रकरणी हमिद महालदार, शब्बीर महालदार, शरिफ महालदार (सर्व राहाणार भोमजाई मोहल्ला) सलमान शेख, एजाज कुरेशी, महमद अन्सारी व साहिद कुरेशी (सर्व राहाणार कुर्ला-मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाचे पोलीस नाईक राजेंद्र गाणार यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.