|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » रस्त्यावरील डबक्यांत मुलांनी सोडल्या कागदी होडय़ा

रस्त्यावरील डबक्यांत मुलांनी सोडल्या कागदी होडय़ा 

डिचोलीतील प्रकार, काहीवेळाने पालिकेकडून डागडुजीला सुरुवात

प्रतिनिधी/ डिचोली

काही वर्षांपूर्वी आमचे पालक लहान असताना या रस्त्याची पायवाट होती. त्यावेळी त्याठिकाणी साचणाऱया पाण्यामध्ये पावसात कागदी होडय़ा सोडत. आज या पायवाटेचा रस्ता होऊनही त्याची अवस्था पूर्वीच्याच पायवाटेप्रमाणे झालेली आहे. त्यामुळे पालकांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्याची संधी आम्हाला लाभली आहे. रस्त्यांवरील डबक्यांत साचलेल्या पाण्यात कागदी होडय़ा सोडल्याची भावनाच जणू व्होडली मार्केट डिचोली येथील लहान मुलांनी आपल्या कृतीतून दाखवून दिली.

सध्या डिचोली बाजारात ये-जा करण्यासाठी अत्यंत सोयीचा रस्ता असलेल्या व्होडली येथील रस्त्याची भुतदयाच सुरू आहे. पावसाळय़ापूर्वी या रस्त्यावरील खड्डे बुजवावे यासाठी तो पूर्वीपणे डांबरीकरण करून त्याला नवीन साज चढविण्यात आला. मात्र जून मध्ये सुरु झालेल्या पहिल्याच पावसात या रस्त्याची खडी उखडू लागली. त्यानंतर दोन वेळा खडी, दगड घालून या रस्त्याची डागडुजी करून लोकांच्या डोळय़ांना पाने पुसण्याचे काम केले. त्यानंतर रस्त्याला तळय़ाचे स्वरुप आले होते.

मुलांनी केल्या आठवणी ताज्या : विनायक च्यारी

या भागात आम्ही लहानाचे मोठे झालो. ऐकाकाळी आम्ही या भागात पाण्यात खेळत होतो. पावसात पाण्यात होडय़ाही सोडत होतो. त्यानंतर या भागाचा विकास झाला. त्यापासून या रस्त्याकडे आम्ही रस्ता म्हणून पहात होतो. मात्र आता या रस्त्याला तळय़ाचे स्वरुप प्राप्त झाल्याने वाडय़ावरील लाहन मुलांनी या डबक्यात कागदी होडय़ा सोडून आमचे बालपण आठवून दिले, असे येथील एक नागरिक विनायक च्यारी यांनी सांगितले.

चालत जायलाही वाट नाही : काशिनाथ च्यारी

पावसापूर्वी डांबरीकरण करण्यात आलेला हा रस्ता म्हणजे आता डोकेदुखी बनला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ात पाणी साचत असल्याने तसेच वाहनांची वर्दळ सुरुच असल्याने पादचाऱयांना चालत जायलाही येत नाही. पूर्वीच्या काळात पायवाटेवर पाणी भरल्यानंतर दगडांवर पाय ठेवून चालत जावे लागत होते. तशीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे, असे काशिनाथ च्यारी यांनी म्हटले आहे.

रस्त्याच्या दुर्देशाची चौकशी व्हावी : रघुनाथ टेंबकर

नगरपालिकेने स्वत: केलेला रस्ता जर दान महिनेही टिकत नाही व वारंवार दुरुस्ती करावी लागत असल्यास दोष कुणाला द्यायचा. रस्त्याची अशी परिस्थिती होण्यास कोण कारणीभूत आहे याची चौकशी व्हावी, अशी मागणी एक दुकानदार रघुनाथ टेंबकर यांनी केली आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी इमारती असल्याने गटार तयार करण्यास जागाच शिल्लक नाही. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे रस्ता उखडायला सुरुवात झाली आहे. हा रस्ता टिकाऊ राहणार असा तयार केला पाहिजे. मात्र आतापर्यंत या रस्त्याचे केलेले काम अनियोजन व विकासाची दुरदृष्टी न ठेवता केल्याचा नमुना म्हणावा लागेल. रस्त्याची वारंवार दुर्दशा होत असल्याने नगरपालिकेचा लाखो रुपये खर्च वाया जात आहे. त्यामुळे याला जबाबदार असलेल्यांवर काय कारवाई होणार, असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे.

होडय़ा सोडताच रस्त्याची डागडुजी सुरु

व्होडलीतील सदर रस्त्यावरील डबक्यातील पाण्यात लहान मुलांनी कागदी होडय़ा सोडल्यानंतर डिचोली पालिकेने त्वरित रस्त्याच्या डागडुजीला प्रारंभ केला. सध्या दगड घालून सर्व खड्डे बुविण्याचे काम हाती घेतले आहे. या पावसाळय़ात रस्यावरील खडी वाहून गेल्यानंतर डागडुजी करण्याची ही तिसरी वेळ आहे. मात्र कंत्राटदार वेगळा आहे. त्यामुळे आता तरी लोकांना दिलासा मिळणार काय असा प्रश्न सध्या नागरिक उपस्थित करीत आहेत.