|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पठारावरील मेगा प्रकल्पांना सांकवाळचे विद्यमान पंचायत मंडळ जबाबदार नाही

पठारावरील मेगा प्रकल्पांना सांकवाळचे विद्यमान पंचायत मंडळ जबाबदार नाही 

वार्ताहर/ झुआरीनगर

सांकवाळच्या पठारावरील महा प्रकल्पांना सांकवाळच्या विद्यमान पंचायत मंडळाने कोणतेही परवाने दिलेले नसल्याचे स्पष्ट करून सांकवाळचे सरपंच गिरीष पिल्ले यांनी   आपले पंचायत मंडळ त्या महाप्रकल्पांना जबाबदार नसल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न ग्रामसभेत केला. काल रविवारी सकाळी झालेल्या सांकवाळच्या ग्रामसभेत उपस्थित नागरिकांनी सांकवाळच्या पठारावरील मेगा प्रकल्पांना जोरदार विरोध केला.

  या ग्रामसभेत सांकवाळच्या मेगा प्रकल्पांच्या प्रश्नांसह कचऱयाचाही प्रश्न होता. मात्र, मेगा प्रकल्पांचा प्रश्न मागच्या महिन्याभरापासून गाजत असल्याने या प्रश्नाचेच सावट या ग्रामसभेवर पडलेले होते. याच प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी झुआरीनगरातील व खास करून एमईएस महाविद्यालय परीसरातील विद्यानगर वसाहतीतील नागरिक मोठय़ा संख्येने या ग्रामसभेत सहभागी झाले होते. आतापर्यत सांकवाळच्या मेगा प्रकल्पांबाबत सांकवाळची पंचायतच लक्ष्य ठरलेली होती. नागरिकांनी ग्रामसभेतही या प्रकल्पांबाबत पंचायत मंडळाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. विद्यानगर भागातील नागरिक नवीन झा यांनी विद्यानगर भागात मोठ मोठय़ा प्रकल्पांमध्ये वाढ झालेली असून स्थानिक लोकांना आता वाढत्या बांधकामांचा त्रास होऊ लागलेला आहे. अनेक समस्या निर्माण होत आहेत. सांकवाळच्या पठारावर होऊ घातलेल्या मेगा प्रकल्पांबाबत स्थानिक नागरिकांना काहीच माहित नव्हते. मात्र, जेव्हा आमच्या नागरिकांना या प्रकल्पांबाबत माहिती मिळल्यापासून नागरिकांनी आवाज उठवणे सुरू केलेले आहे. सध्या या भागाला सोयीस्कर रस्ताच नाही. मेगा प्रकल्प या ठिकाणी उभे राहिल्यास समस्यांमध्ये अधिकच वाढ होणार असल्याचे सांगून प्रकल्पांना विरोध केला.

  विद्यानगर वसाहतीतील नागरीक सुरेंद्र नाईक यांनी आपला विकासाला विरोध नसल्याचे स्पष्ट करून सोयीसुविधांचा प्रश्न असल्याचे सांगितले. आधीच या भागात अनेक समस्या आहेत. त्यामुळे नवीन प्रकल्पांमुळे सोयीसुविधांच्या समस्या  अधिकच वाढणार असल्याचे त्यांनी पंचायतीच्या नजरेस आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सांकवाळचे सरपंच गिरीष पिल्ले यांनी आपले स्पष्टीकरण देताना सांकवाळच्या विद्यमान पंचायत मंडळाने कोणत्याही मेगा प्रकल्पाला कोणतेही परवाने दिलेले नसल्याचे सांगितले. त्यामुळे सांकवाळच्या पठारावरील होऊ घातलेल्या मेगा प्रकल्पांकडे सांकवाळच्या विद्यमान पंचायत मंडळाचा कोणताही संबंध अद्याप आलेला नसल्याचा खुलासा त्यांनी केला. विद्यमान मंडळाने चार फ्लॅटपेक्षा अधिक मोठय़ा इमारतींना अद्याप परवाना दिलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. मेगा प्रकल्पांसंबंधी जो काही व्यवहार झालेला आहे तो मागच्या मंडळाच्या काळात झालेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मेगा प्रकल्पांबाबत पंचायतीविरूध्द आवाज करण्यापूर्वी नागरिकांनी पंचायतीशी संपर्क साधून चौकशी केली असती तर सत्य माहिती नागरिकांना मिळाली असती ते सरपंच म्हणाले.

  मात्र, उपस्थित नागरीकांनी मेगा प्रकल्पांना दिलेले सर्व परवाने मागे घेण्यात यावेत अशी मागणी या सभेत केली. त्यावर सरपंचांनी एकदा दिलेले परवाने परत घेणे शक्य आहे काय याची शहनिशा करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेऊन पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन ग्रामसभेला दिले.

  या ग्रामसभेत मेगा प्रकल्पांच्या अनुषंगानेच सोशल मिडियावर सांकवाळ पंचायतीची बदनामी करणारा एक संदेश फिरत होता. हा संदेश सरपंच्यांनी वाचून दाखवला. या बदनामीला काहीच आधार नसल्याने ज्याने हा संदेश मिडियावर प्रसारीत केला, त्याच्याकडे स्पष्टीकरणाची मागणी केली. या विषयावर बराच वेळ गदारोळ माजला. शेवटी संदेश प्रसारीत करणाऱयाने माफी मागीतल्याने या प्रश्नावर पडदा पडला.

  या सभेत कचऱयाचाही प्रश्न उपस्थित झाला. कचऱयाचा प्रश्न सोडवण्यासाठी जमीन मिळवण्याचे प्रयत्न चालूच असल्याचे सरपंचांनी सांगितले. झुआरीनगर व सांकवाळ या भागात बेकायदा दूरध्वनी मनोरे उभारण्यात आल्याची तक्रार नागरिकांनी मांडली. हे मनोरे त्या ठिकाणाहून हटवण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर सरपंचांनी सदर मनोऱयांची पाहणी करून निर्णय घेण्याचे आवश्वासन दिले. सांकवाळ पंचायत क्षेत्रातील महामार्गावर जाहीरात फलक उभारण्याचे प्रकार वाढलेले असल्याचे सांगून या फलकांमुळे वाहतुकीला धोका उद्भभवत असल्याचे नागरिकांनी नजरेस आणून दिले व या प्रकाराविरूध्द कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. ग्रामसभेला अकरापैकी दहा पंच सदस्य व पंचायत सचिव तसेच कर्मचारी उपस्थित होते.