|Saturday, February 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नासाच्या ‘टच द सन’ मिशनची ऐतिहासिक झेप

नासाच्या ‘टच द सन’ मिशनची ऐतिहासिक झेप 

यान सूर्याकडे झेपावले : 5 नोव्हेंबरला निर्धारित स्थळी पोहोचणार : सूर्याचा अधिक अभ्यास करता येणार

फ्लोरिडा / वृत्तसंस्था

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचे पार्कर सोलर प्रोब हे यान रविवारी पहाटे सूर्याच्या दिशेने यशस्वीपणे झेपावले आहे. मानवी इतिहासात पहिल्यांदाच एक अंतराळ यान सूर्याच्या दिशेने झेपावले असून हे यान 7 वर्षांमध्ये सूर्याभोवती 7 प्रदक्षिणा घालणार आहे. अमेरिकेच्या स्थानिक प्रमाणवेळेनुसार पहाटे 3.30 वाजता नासाचे हे यान ऐतिहासिक प्रवासास निघाले. स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी सुमारे 5.30 वाजता यातील सौर पॅनेल उघडण्यात आले, हे पॅनेल सूर्याची उष्णता शोषून यानाच्या प्रवासाला ऊर्जा पुरवतील. अब्जावधी डॉलर्स खर्च करून निर्माण केलेले हे यान काही दिवसांतच सूर्यानजीक पोहोचेल. यान आणि सूर्यादरम्यानचे अंतर केवळ 40 लाख मैल असणार आहे.

सूर्याची उष्णता, सूर्यानजीकच्या वातावरणात दैनंदिन होणारे बदल, अंतराळातील हालचाली या सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे यान नष्ट होऊ नये याकरता त्यावर उष्णतारोधक आवरण बसविण्यात आले आहे. अमेरिकेचे खगोलशास्त्रज्ञ यूजीन नेवमॅन पार्कर यांचं नाव यानाला देण्यात आले आहे. या अंतराळयानाचा वेग 4 लाख 30 हजार किलोमीटर प्रतितास राहणार असून 2,500 अंश सेल्सिअस तापमान झेलण्याची यात क्षमता आहे.

पार्कर सोलर प्रोब यान 85 दिवसांनी 5 नोव्हेंबर रोजी सूर्याच्या कक्षेत दाखल होईल. सूर्य पृथ्वीपासून सुमारे 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. यानाला सूर्यापासून 61 लाख किलोमीटर अंतरावर स्थापित केले जाईल. हे यान सूर्याच्या सर्वात नजीक पोहोचण्याचा मान मिळविणार आहे. या अगोदर सूर्याच्या सर्वात नजीक 1976 मध्ये हिलियोस-2 नावाचे यान पोहोचले होते. परंतु ते देखील सूर्यापासून सुमारे 4.3 कोटी किलोमीटर अंतरापर्यंतच गेले होते. हिलियोसच्या तुलनेत पार्कर प्रोब सूर्याच्या 7 पट अधिक जवळ असेल.

यानाचा वेग

नासाचे हे अंतराळयान सूर्यापर्यंत सुमारे 7 लाख किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने पोहोचले. पृथ्वीवर या वेगाच्या माध्यमातून केवळ 7 सेकंदांमध्ये दिल्ली ते मुंबई अंतर गाठता येणार आहे. नासा या मोहिमेकरता 1.5 अब्ज डॉलर्स (सुमारे 10 हजार कोटी) खर्च करणार आहे.

सौरवादळांचा अभ्यास

सूर्यातून बाहेर पडणारी किरणे आणि सौरवादळांचे संशोधन करण्याचा वैज्ञानिकांचा प्रयत्न आहे. या दोन्ही गोष्टींचा पृथ्वीवर मोठा प्रभाव पडतो, तंत्रज्ञान, अंतराळयानाला सौरवादळांचा फटका बसल्याने दूरसंचार सेवा बंद पडते. पॉवरग्रिडच्या कामकाजात अडथळा निर्माण होतो. असे का घडते, या मोहिमेच्या माध्यमातून या प्रश्नांची उत्तरे शोधली जाणार आहेत. सौरवादळ पृथ्वीपासून काही अंतरावर  लाखो किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने जातात आणि अंतराळाचे तापमान बदलण्यात यांची महत्त्वाची भूमिका असते. तसेच सौरवादळांमुळे पृथ्वीचे तापमान देखील प्रभावित होते.

प्रभावळक्षेत्रात अधिक तापमान

आम्ही आगीच्या नजीक गेलो असता, अधिक उष्णता भासते, दूर गेल्यास स्थिती पूर्ववत होते. परंतु सूर्यासोबत असे घडत नाही. सूर्याचा पृष्ठभाग 10 हजार अंश फॉरेनहाइटपर्यंत उष्ण आहे. याचे बाहेरील आवरण म्हणजेच प्रभावळक्षेत्राचे तापमान लाखो अंशांपर्यंत आहे. सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा प्रभावळक्षेत्र अधिक उष्ण का आहे, याचे रहस्य या मोहिमेमुळे उलगडू शकते.

मोहिमेमागे भारतीयाचा विचार

मानवी इतिहासात पहिल्यांदाच सूर्याच्या कक्षेनजीक पोहोचणाऱया नासाच्या यानामागे भारतीयाचे प्रयत्न कारणीभूत आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी 60 वर्षांपूर्वी सौरवादळांच्या अस्तित्वाशी संबंधित संशोधन प्रकाशित करण्यात मोठी भूमिका पार पाडली होती. सोलर पार्कर प्रोब हे नाव खगोलशास्त्रज्ञ युजीन पार्कर यांच्या नावावर देण्यात आले आहे. पार्कर यांनीच 1958 मध्ये पहिल्यांदा सौरवादळांचे अस्तित्व असल्याचे अनुमान व्यक्त केले होते. 1958 मध्ये 31 वर्षीय पार्कर यांनी चार्ज्ड पार्टिकल्स सातत्याने सूर्यामधून बाहेर पडतात आणि अंतराळात फैलावतात असे म्हटले होते. त्यांच्या या दाव्यावर वैज्ञानिक समुदायाने विश्वास ठेवण्यास नकार दिला होता. पार्कर यांनी ऍस्ट्रोफिजिकल जर्नलला (या क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित संशोधन पत्र) आपले संशोधन सोपविले असता दोनवेळा ते फेटाळण्यात आले. त्यावेळी संशोधन पत्राच्या वरिष्ठ संपादकांनी हस्तक्षेप करत दोन्ही समीक्षकांचा निर्णय बदलून पार्कर यांचे अनुमान प्रकाशित करण्याची अनुमती दिली होती. सुब्रमण्यम चंद्रशेखर हेच ते संपादक होते. चंद्रशेखर यांना 1983 मध्ये नोबेल पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते.

 

Related posts: