|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » भाजपचे लाभार्थी होऊन राणेंचा रिफायनरीला विरोध!

भाजपचे लाभार्थी होऊन राणेंचा रिफायनरीला विरोध! 

भाजपकडून घेतलेले लाभ तरी सोडा किंवा रिफायनरी विरोध तरी सोडा! : भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचे आव्हान

वार्ताहर / कणकवली:

खासदार नारायण राणे व आमदार नीतेश राणे हे ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत प्रकल्पाविषयी विरोधी मत जाहिररित्या जनतेमध्ये मांडतात. तुम्ही भाजपचे लाभार्थी नसता, तर तुमचे म्हणणे जनतेने नक्की ऐकले असते. मात्र, भाजप पक्षाचे लाभार्थी होऊन स्वत:चा फायदा करून घेत जनतेने मात्र कायम दारिद्रय़ात दिवस काढावेत, हीच यांची इच्छा आहे. आपण एक तर भाजपकडून घेतलेले लाभ तरी सोडा, नाही तर रिफायनरी प्रकल्पाचा विरोध तरी जनतेसाठी सोडा, असे आव्हान जठार यांनी दिले आहे.

नाणार रिफायनरीच्या विरोधावरून राणेंना जठार यांनी टिकेचे लक्ष केले आहे. जठार पुढे म्हणतात, भाजप केंद्र व राज्य सरकारने आणलेला हा रिफायनरी प्रकल्प कोकणी माणसाच्या नोकरीसाठी चालणारी दगदग कायमची संपविणारा, देशाला, राज्याला आणि कोकणलाही आर्थिक संपन्नता देणारा प्रकल्प आहे. तो आणताना येथील पर्यावरणाचे संरक्षण, प्रकल्पग्रस्तांचा सन्मान व स्थानिक बेरोजगारांना नोकरी या त्रिसुत्रीवर आधारित हा प्रकल्प आहे.

राणे भाजपच्या चिन्हावर आहेत खासदार!

पक्षीय धोरणाबाबत कोणतीही मतभिन्नता असेल, तर पक्षाच्या बैठकीत, कार्यकारिणीमध्ये त्याची चर्चा होऊन सर्व संमतीनेच धोरण ठरले जाते. आमदार नीतेश राणे यांचे वडील भाजपच्या चिन्हावर खासदार आहेत. नीतेश किंवा नारायण राणे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांना भेटू शकतात. त्यांचे प्रकल्पाबाबतचे विरोधी मत ते मांडू शकतात. प्र्रकल्पाच्या फायद्या-तोटय़ाचा विचार त्यांना सांगू शकतात. पक्षाचे वरि÷ त्यांचे म्हणणे पटल्यास प्रकल्प रद्द करू शकतात किंवा राणे पिता-पुत्रांना त्यांचे म्हणणे पटले, तर तेही या प्रकल्पाचे समर्थन करू शकतात, असा टोला जठार यांनी लगावला.

युवकांना बेरोजगारीच्या खाईत ढकलू नका!

 रिफायनरी विरोधाची ढोलकी दोन्हीकडून बडवण्याचा राणेंचा उद्योग जनता आता ओळखून चुकली आहे. चेंबूरच्या प्रकल्पातील आग हे प्रकरण लवकरच जनतेसमोर येईल. या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी, अशी मागणी आम्ही करीत आहोत. मात्र, त्या आगीवर तुमची आमदारकी व खासदारकीची पोळी भाजून कोकणातील तरुण मुला-मुलींना बेरोजगारीच्या खाईत ढकलू नका, असे जठार यांनी म्हटले आहे.