|Saturday, November 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वैभववाडी, कणकवली, कुडाळला थांबा

वैभववाडी, कणकवली, कुडाळला थांबा 

गणेशोत्सवातील 150 विशेष गाडय़ांचा समावेश : मनसे सरचिटणीस उपरकर यांना कोकण रेल्वेचे पत्र : कोकण रेल्वेच्या ‘एमडीं’कडे केली होती मागणी

प्रतिनिधी / कणकवली:

गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावरून 182 विशेष गाडय़ा धावणार आहेत. या पैकी 32 गाडय़ा रत्नागिरी स्टेशनपर्यंत, तर 150 गाडय़ा सिंधुदुर्ग जिल्हय़ापर्यंत जाणार आहेत. या विशेष गाडय़ांपैकी 132 गाडय़ांना वैभववाडी, 150 गाडय़ांना कणकवली व कुडाळला 140 गाडय़ांना सावंतवाडी स्टेशनवर थांबे देण्यात आले असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य वाणिज्य प्रबंधक तथा मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांना कळविल्याचे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

उपरकर यांची कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांशी 3 ऑगस्ट रोजी बैठक झाली होती. यावेळी कोकण रेल्वे मार्गावरील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली होती. उपस्थित केलेल्या समस्यांच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती उपरकर यांना कळविण्यात आली आहे.

150 गाडय़ा थांबणार कुडाळला

उपरकर यांना कळविण्यात आलेल्या पत्रानुसार 182 विशेष गाडय़ांपैकी 176 गाडय़ा संगमेश्वर, 150 पैकी 138 राजापूर, 132 वैभववाडी, 150 कणकवली व कुडाळ, तर 140 गाडय़ा सावंतवाडीत थांबणार आहेत. 11 सप्टेंबर रोजी 8 व 12 रोजी 5 अतिरिक्त गणपती स्पेशल गाडय़ा सुटणार आहेत. 12 रोजी आणखी गाडय़ा सोडण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. विसर्जनानंतर 17 रोजी 4, तर 18 रोजी तीन स्पेशल गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. या दिवशी आणखी गाडय़ा सोडण्याचा प्रयत्न असणार आहे.

दिवा स्टेशनवर थांब्याचा निर्णय मध्य रेल्वेकडे

दिवा स्टेशन हे मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात येत आहे. या गाडय़ांना दिवा स्टेशनवर थांबा देण्यासंदर्भातील निर्णय हा मध्यरेल्वेचा आहे. आपल्या मागणीनुसार यासंदर्भात मध्य रेल्वेला कळविण्यात आले आहे. नेत्रावती 16346 ही गाडी कोकणकन्या 10111 या गाडीला क्रॉसिंगसाठी कणकवली स्टेशनवर थांबते. त्या गाडीला कणकवलीला थांबा मिळावा, या मागणीसंदर्भात गाडीला कणकवलीला क्रॉसिंग नाही, गाडय़ा वेळेत न निघाल्यास या गाडय़ा कणकवलीला क्रॉसिंग होतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

वैभववाडी स्टेशनवर टाऊन बूकिंग सुरू

वैभववाडी स्टेशनवर देण्यात आलेले टाऊन बूकिंग 6 जूनपासून सुरू असून गेल्या दोन महिन्यांत तेथे 144 तिकीटे काढण्यात आली आहेत. कोकण रेल्वेत होणारी भरती प्रकल्पग्रस्तांमधून करावी, या मागणीसंदर्भात समीक्षा करून कार्यवाही करण्यात येईल. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या विवाहित मुलींना सेवेत भरती करण्यासंदर्भातही समीक्षा करून कार्यवाही करण्यात येईल, असेही कोकण रेल्वेकडून उपरकर यांना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

तुतारी एक्सप्रेसला जादा तीन डबे जोडा

दरम्यान, या बैठकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीच्या पत्रानंतर बऱयापैकी मुद्दय़ांचे निर्णय लावण्यात आले आहेत. काही मुद्दय़ांवर गणेशोत्सवानंतर चर्चा करू. ठाणे येथील दिवा स्टेशनवर गाडय़ा थांबविण्याबाबत जनरल मॅनेजर सेंट्रल रेल्वेला कळविण्यात आले आहे. बांद्रा व विरार वेस्टर्न लाईनवरून गाडय़ा सोडण्याबाबत परवानगी देण्यासाठी वेस्टर्न रेल्वेला कळविले आहे. आपणही पाठपुरावा करावा, असे उपरकर यांनी कळविले आहे. दादरवरून सुटणारी तुतारी एक्सप्रेस ही गाडी सावंतवाडीपर्यंत असल्याने या गाडीला वेटींग लिस्ट मोठी असते.  या गाडीला तीन जादा डबे लावल्यास कोकण रेल्वेचे उत्पन्न वाढेल व कोकणी माणसांना प्रवासही सुखकर होईल, याकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी उपरकर यांनी केली आहे.

Related posts: