|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘एसटी’ प्रवर्ग आरक्षणाची अंमलबजावणी करा

‘एसटी’ प्रवर्ग आरक्षणाची अंमलबजावणी करा 

कुडाळ तालुका धनगर समाज बांधवांची मागणी : मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी तहसीलदारांकडे निवेदन सादर : शहरात काढण्यात आली मोटारसायकल रॅली : अन्यथा 1 सप्टेंबरापासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

वार्ताहर / कुडाळ:

धनगर समाजाला राज्य घटनेत दिलेल्या अनुसुचित जमाती (एसटी) प्रवर्गातील आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी सोमवारी कुडाळ तहसीलदार यांना तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीने दिलेल्या निवेदनातून केली आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत 31 ऑगस्टपर्यंत ठोस भूमिका न घेतल्यास 1 सप्टेंबरपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धनगर समाज बांधवांनी शहरात मोटारसायकल रॅली काढली.

जिल्हय़ासह महाराष्ट्रात सुमारे दोन कोटांहून अधिक धनगर बांधव आहेत. आमच्या समाजाला अनुसुचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी चार वर्षे आपल्याकडे करीत आहोत. गेली 60 ते 65 वर्षे तत्कालीन सरकारकडेही एसटी प्रवर्गातील आरक्षणाची मागणी होत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

सरकारने आरक्षणाचा प्रश्न लांबणीवर टाकला!

2014 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देण्याचे भाजपने मान्य केले होते. धनगर समाजाने विश्वास ठेवून भरघोस मतांनी भाजपला सत्तेवर आणले. मात्र, सरकारने महाराष्ट्रात ओरान, धनगड व धनगर एकच असल्याचे केंद्र सरकारला कळविणे आवश्यक होते. पण धनगर समाज बांधवांच्या डोळय़ात धूळफेक करीत शासनाने ‘टीस’ कमिटी स्थापन केली आणि धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न लांबणीवर टाकला, असा आरोपही मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी दिलेल्या निवेदनात समितीने केला आहे.

… अन्यथा आंदोलन छेडणार

31 ऑगस्टपर्यंत धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ठोस भूमिका घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा 1 सप्टेंबरपासून धनगर समाज आंदोलन छेडणार आहे. धनगर समाज आपल्याला सत्तेवर बसवू शकतो. तसा सत्तेतून खाली खेचू शकतो, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

कुडाळ शहरात मोटारसायकल रॅली

आज सकाळी तालुका धनगर समाज बांधवांनी शहरात नवीन बसस्थानक, हॉटेल गुलमोहर, गांधीचौक ते तहसीलदार अशी मोटारसायकल रॅली काढली. यावेळी घोषणाही दिल्या. नंतर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार टी. एम. मठकर यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले. धनगर समाजाचे समन्वयक सुरेश झोरे, कानू शेळके, दीपक खरात, प्रभाकर बुटे, रामचंद्र काळे, किशोर वरक, शरद खरात, अनिल झोरे, बाबू खरात आदी समाजबांधव उपस्थित होते.

आदिवासी मंत्र्यांकडून खोटी शपथपत्रे!

मागील सरकारने जसे महाराष्ट्रात धनगड नावाच्या जातीचे भूत उभे करून समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले. तसे आता तुमच्या सरकारमधील आदिवासी मंत्रीही मुंबई न्यायालयात खोटी शपथपत्रे दाखल करून धनगर समाजावर अन्याय करीत आहेत, असाही आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे.