|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शहरांच्या स्वच्छतेसाठी ‘स्वच्छ ऑगस्ट क्रांती’ मोहीम

शहरांच्या स्वच्छतेसाठी ‘स्वच्छ ऑगस्ट क्रांती’ मोहीम 

31 ऑगस्टपर्यंत राबविणार मोहीम : कचरा ओला – सुका विलगीकरण करणार : विलगीकृत कचऱयावर शास्त्राsक्त प्रक्रिया :  नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱयांवर जबाबदारी

दिगंबर वालावलकर / कणकवली:

स्वच्छ महाराष्ट्र नागरीअंतर्गत 31 ऑगस्टपर्यंत कचरा विलगीकरण स्वच्छ ऑगस्ट क्रांती मोहीम राबविण्याचा निर्णय झाला आहे. 1 ऑगस्टपासून ही मोहीम सुरू झाली आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी या कालावधीत शहरात निर्माण होणाऱया घनकचऱयापैकी किमान 80 टक्के कचऱयाचे निर्मितीच्या जागी विलगीकरण करण्यात येणार आहे. कचऱयाचे घरोघरी जाऊन 100 टक्के संकलन व वाहतूक करणे व विलगीकरण झालेल्या कचऱयावर शास्त्राsक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी हे सर्वस्वी जबाबदार असतील. या कालावधीत दिलेली उद्दिष्टपूर्ती करतील, त्याच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना शासनस्तरावरून प्राधान्याने अनुदाने देण्याबाबत शासन विचार करणार आहे.

स्वच्छ ऑगस्ट क्रांती मोहिमेंतर्गत रोज केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबंधित जिल्हा प्रशासन अधिकाऱयांकडे पाठविण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिलेल्या अहवालानुसार प्रत्यक्ष कार्यवाही होते की नाही, याची आठवडय़ातून एकदा संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेला भेट देऊन खात्री करावी, अशा सूचना आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात घेण्यात येणार आहे.

रुट मॅपला प्रसिद्धी द्यावी लागणार

या मोहिमेंतर्गत शहरातील प्रत्येक प्रॉपर्टी व प्रभाग विचारात घेऊन घनकचऱयाच्या संकलनासाठी उपलब्ध असलेल्या घंटागाडय़ा क्षमतेनुसार रुट मॅप व घंटागाडीचे वेळापत्रक तयार करून त्याद्वारे शहरातील 100 टक्के प्रॉपर्टीजमधून रोज कचरा संकलन होईल, याबाबत दक्षता घ्यायची आहे. प्रत्येक प्रभागात रुट मॅपला व वेळापत्रकाला व्यापक प्रसिद्धी देऊन वेळेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संकलीत केलेला विलगीकृत कचरा वाहतूक करताना एकत्र होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. नालीचा गाळ व राडा रोड याची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करावी लागणार आहे. कचरा संकलनाचे व वाहतुकीचे लॉगबूक तयार करून ते रोजच्या रोज अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

घंटागाडीत कंपार्टमेंटची व्यवस्था करावी लागणार

कचरा विलगीकरण करताना तो ओला-सुका असा विलगीकरण करण्यात येणार आहे. विलगीकृत कचऱयाच्या संकलनासाठी घंटागाडीत 2 वेगवेगळ्य़ा कप्प्यांची (कंपार्टमेंट) व्यवस्था करण्यात येणार आहे. घंटागाडीसोबत चालकाव्यतिरिक्त एक कर्मचारी नियुक्त करावा लागणार आहे. या कर्मचाऱयाने कचऱयाचे विलगीकरण करण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करायचे आहे. नागरिकांना ओला-सुका व मिश्र कचरा आणल्यास तो विलगीकृत करण्याबाबत 3 ते 4 दिवस संबंधित कर्मचाऱयाने प्रात्यक्षिक सादर करायचे आहे. नंतर मिश्र कचरा आणल्यास संबंधित नागरिकांकडून कचऱयाचे विलगीकरण करून घ्यायचे आहे.

स्वयंसहाय्यता गट, शाळा, महाविद्यालयांचाही सहभाग

कचरा निर्मात्याने निर्मितीच्या जागी कचऱयाचे विलगीकरण करावे, अशी जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 अन्वये निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शहरातील नागरिकांनी कचऱयाचे विलगीकरण करावे, यासाठी जनजागृतीच्या सूचना दिल्या आहेत. शहरांमधील स्वयंसहाय्यता गट, शाळा, महाविद्यालय, अशासकीय संस्था यांचाही यासाठी समावेश करून घ्यायचा आहे. शहरातील कचरावेचकांना या कामात समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. तसेच ‘डे-एनयूएलएम’अंतर्गत बचत गटांचा या कामात समावेश करून घ्यावा, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

विलगीकृत कचऱयावर शास्त्राsक्त प्रक्रिया

विलगीकरण केलेल्या कचऱयापैकी ओल्या कचऱयावर कंपोस्टिंग किंवा बायो – मिथेनायजेशन या शास्त्राsक्त पद्धतीने केंद्रीत किंवा विकेंद्रीत पद्धतीने प्रक्रिया करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील सर्व शहरांचे घनकचरा व्यवस्थापनाचे  प्रकल्प अहवाल तयार करण्यात आले आहेत. या अहवालात शहरातील कचऱयावर शास्त्राsक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. मात्र, याच्या अंमलबजावणीसाठी अजून काही कालावधी जाणार आहे. तोपर्यंत संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने शहरात उपलब्ध असलेल्या जागा व साहित्यांचा उपयोग करून विलगीकृत कचऱयावर केंद्रीत किंवा विक्रेंद्रीत पद्धतीने प्रक्रिया करायची आहे. विलगीकरण केलेल्या कचऱयापैकी सुक्या कचऱयाचे पुन्हा विलगीकरण करून तो पुन:प्रक्रिया करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. पुन:प्रक्रिया होऊ न शकणारा उर्वरित सुका कचरा भरावभूमीवर पाठविण्यात येणार आहे. विलगीकरण, संकलन व वाहतूक तसेच शास्त्राsक्त प्रक्रिया करण्यासाठी कायमस्वरुपी व्यवस्था अस्तित्वात आणली पाहिजे ही व्यवस्था व्यक्ती आधारित नसावी, असेही स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. कचरा कंत्राटदाराच्या अटी व शर्तीनुसार ही कामे करून घेण्याची व त्यानुसार देयके अदा करण्याची जबाबदारी ही संबंधित मुख्याधिकारी यांची असणार आहे.