|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंबोलीत दोन पर्यटक जखमी

आंबोलीत दोन पर्यटक जखमी 

धबधब्याखाली आनंद लुटतांना घटना

जखमी पर्यटक हुबळीचे

वार्ताहर / आंबोली:

आंबोली घाटातील मुख्य धबधब्यावरून पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड अंगावर पडल्याने हुबळी येथील दोन पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहे. घाटातील धबधबे धोकादायक बनले आहेत. गेल्या आठवडय़ात स्थानिक पर्यटकांवर अशीच वेळ आली होती.

आंबोलीत वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी बेळगाव-हुबळी येथून 35 जणांचा ग्रुप दोन दिवसांपूर्वी आला होता. शनिवार-रविवारी मौजमजा केल्यानंतर सोमवारी घाटातील धबधब्याजवळ आंघोळ करण्यासाठी या पर्यटकांची टीम सकाळी 9.30 वाजता पोहोचली. त्यातील काहीजण धबधब्याखाली आनंद लुटत असतांनाच पाण्याच्या प्रवाहाबरोबर आलेला दगड खाली येत दोघांच्या अंगावर दगड पडला. त्यात ते जखमी झाले. गायत्री घुलाप्पा सुकाण (45) यांच्या पायाला जखम झाली. तर जगदीश महादेवप्पा मालशेट्टी (36, दोन्ही रा. हुबळी-कर्नाटक) यांच्या गालाला व कानाला दुखापत झाली. त्यांना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.

पंधरा दिवसातील दुसरी घटना

याच धबधब्याचा आनंद लुटतांना कुडाळ येथील एका पर्यटकाच्या अंगावर दगड पडून तो जखमी झाला होता. त्यानंतर वनविभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना हाती न घेतल्याने पुन्हा ही घटना घडली. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धबधब्याच्या प्रवाहातून आलेला दगड या दोन पर्यटकांच्या डोक्यावर पडला असता तर मोठी जीवितहानी घडली असती.