|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » ‘एटीएस’ तपास युद्धपातळीवर

‘एटीएस’ तपास युद्धपातळीवर 

पुणे, कोल्हापूर / प्रतिनिधी

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) नालासोपारा येथील स्फोटक जप्त प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे. अटकेत असलेल्या हिंदू जनजागृती समितीचा कार्यकर्ता वैभव राऊत याचा साथीदार सुधन्वा गोंधळेकरच्या पुण्यातील घराची सोमवारी पुन्हा एकदा झडती घेण्यात आली. या कारवाईत सहा हार्ड डिस्क,  लॅपटॉप, तब्बल 9 मोबाईल फोनसह अनेक सीमकार्ड जप्त करण्यात आली आहेत.  या माध्यमातून ‘माहितीचा खजाना’ आणि अन्य संशयितांविषयी ठोस माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक संशयित आरोपी शरद कळसकरचे कोल्हापुरात वास्तव्य असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर एटीएसचे पथक कोल्हापुरात तळ ठोकून आहे. दोन पथके पुण्या-मुंबई, कर्नाटकात तपास करत असून, या प्रकरणातील आणखी ठोस धागेदोरे हाती येण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.

  सुधन्वा गोंधळेकर हा टेक्निकल एक्सपर्ट आहे. त्याच्या घरातून एटीएसने सहा हार्ड डिस्क, लॅपटॉप, नऊ मोबाईल, अनेक सीमकार्ड जप्त केले आहेत. तसेच एक कार आणि मोटारसायकलही जप्त करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. याआधी एटीएसने सुधन्वाच्या घरातून मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता.

पार्सल बॉम्बप्रकरणी चौकशी?

सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांना काही महिन्यांपूर्वी पार्सलमधून बॉम्ब पाठवण्याचा प्रयत्न झाला होता. हा पार्सल बॉम्ब कुरियर कंपनीच्या कार्यालयात फुटला होता. या प्रकरणात वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर यांचा काही संबंध आहे का, याचीही चौकशी एटीएसकडून करण्यात येत असल्याचे समजते.

                                     एटीएसच्या पथकाचा कोल्हापुरात तळ

नालासोपारा स्फोटकप्रकरणी एटीएसने अटक केलेल्या संशयित आरोपी शरद कळसकर याचे कोल्हापुरात वास्तव्य असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. याची सखोल माहिती घेण्यासाठी एटीएसचे पथक कोल्हापुरात तळ ठोकून आहे. दोन पथके पुण्या-मुंबई, कर्नाटकात आहेत. या पथकाने सोमवारी कळसकरचे वास्तव्य असलेल्या उद्यमनगर या परिसरावर फोकस केल्याचे समजते, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी एटीएस, एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक घेतली. यावेळी पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासाचा आढावा त्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पानसरे हत्येचे धागेदोरेही तपासणार

शरद कळसकर याचे कोल्हापुरात चार वर्षे वास्तव्य होते. तो शहरातील एका औद्योगिक वसाहतीत टर्नर म्हणून लेथ मशिनवर काम करत होता, एका शैक्षणिक संस्थेतून त्याने हे प्रशिक्षण घेतल्याची चर्चा आहे. ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे हत्येवेळी तो कोल्हापुरात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कळसकरकडून पानसरे हत्याप्रकरणी महत्त्वाची माहिती मिळण्याची आशा एसआयटीला आहे. कळसकरचे कोल्हापूर वास्तव्यातील सीडीआर तपासले जात आहेत. त्याद्वारे त्याच्या संपर्कांतील व्यक्तींकडे एसटीएस, एसआयटीसह स्थानिक पोलीस चौकशी करत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

एटीएसचे पथक स्थानिक पोलिसांच्या मदतीने कळसकरशी निगडीत लोकांची माहिती घेत आहे. दोन पथके पुण्या-मुंबईत तर एक कर्नाटकात माहिती घेत आहे. तपासाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी सकाळी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी एटीएस, एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक घेतली.