|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » चाकूचा धाक दाखवत वृद्धेस लुटण्याचा प्रयत्न

चाकूचा धाक दाखवत वृद्धेस लुटण्याचा प्रयत्न 

प्रतिनिधी/ सातारा

पोवनाक्यावरील बॉम्बे चिफ कपडय़ाचे दुकान फोडल्याची घटना ताजी असतानाच आता शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पंताचा गोट परिसरात रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्याने घरातील वृद्ध महिलेच्या गळ्याला चाकू लावून चोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु महिलेने आरडाओरड केल्यामुळे चोरटय़ाने चोरी न करताच धूम ठोकली. 

याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, रेखा विजय महाडिक (वय 65, रा. पंताचा गोट, सातारा) या रविवारी रात्री घरात काम करत होत्या. दरम्यान, त्यांच्या घराची बेल वाजल्याने त्यांनी दरवाजा उघडला असता समोर एक व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून उभा होती. त्याने त्याच्या हातातील चाकू रेखा महाडिक यांच्या गळ्याला लावून अंगावरील आणि घरातील सोन्याचे दागिने तसेच पैसे काढून दे, अशी धमकी दिली. त्यानंतर रेखा यांनी आरडाओरडा केल्यानंतर चोरटा पळून गेला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव ढेकळे करीत आहेत.

चारच दिवसांपूर्वीच साताऱयातील पोवईनाका परिसरातील बॉम्बे चिफ हे कपडय़ाचे दुकान अज्ञात चोरटय़ाने फोडून चोरी केली होती. तो ही चोरटा एकटाच होता, त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारातच चोरी करून चोरटा पोलिसांना आव्हान देत आहे की काय? अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. पोलिसांनी सर्व दुकानदारांना बाहेर सीसीटीव्ही बसवण्याची सक्ती केली आहे. यामुळे रात्रीच्या वेळी फिरणारे चोरटे कॅमेऱयात कैद होण्यास मदत होणार आहे.