|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » डॉ.दाभोळकरांचा हत्यादिन ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’

डॉ.दाभोळकरांचा हत्यादिन ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ 

ऑनलाईन टीम / पुणे :

  • पीपल्स सायन्स नेटवर्क, अनिसतर्फे निर्णय

 

          डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा हत्यादिन यावर्षीपासून ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ म्हणून पाळण्याचा निर्णय ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी घेतला आहे. विज्ञान, शिक्षण, विवेकवाद आदी विषयांवर काम करणाऱया अनेक संस्था व संघटनांनी या आवाहनाला प्रतिसाद देशभरात विविध कार्यक्रम व उपक्रमांची आखणी केल्याचे गीता महाशब्दे यांनी पुण्यात जाहीर केले. यानिमित्ताने रविवारी 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजता सिंबायोसिस विश्वभवनमध्ये ‘वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय’ या विषयावर एका जाहीर सभेचे आयोजनही करण्यात आले आहे.

          ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क, नवनिर्मिती लर्निंग फाऊंडेशन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लोकविज्ञान संघटना व सिंबायोसिस स्कूल फॉर लिबरल आर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत डॉ. जयंत नारळीकर यांचे ‘एकविसाव्या शतकात जगायला शिकताना’, मुक्ता दाभोळकर यांचे ‘शोषणरहित समाजासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन’, डॉ. सत्यजित रथ यांचे ‘परंपरा आणि नवता-एक वैज्ञानिक दृष्टिकोन’, तसेच डॉ. विवेक मॉटेरो यांचे ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दिवस कशासाठी’ या विषयावर व्याखन होणार आहे. राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवसाच्या या मोहिमेचे ‘विचारा का?’ असे घोषवाक्य देण्यात आले आहे. यानिमित्ताने वैज्ञानिक पद्धती विशद करणाऱया 18 विज्ञान प्रयोगांची इ-पुस्तिका विविध भाषांमध्ये तयार करण्यात आली आहे. डॉ. दाभोळकर यांची दोन मराठी भाषणे, इंग्रजी व अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरीत करण्यात आली आहेत. त्यांच्या भाषणाचा एक संकलित व्हिडिओ इंग्रजी, हिंदी व कानडीत डब करण्यात आला आहे. 20 ऑगस्ट रोजी देशभरातील हजारो शाळा व महाविद्यालयांमध्ये या ध्वनिचित्रफिती दाखवल्या जाणार आहेत.

Related posts: