|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा’

‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा’ 

मुंबईतील वाजपेयींचे बोल भाजपसाठी संजीवनी

34 वर्षांनंतर भविष्यवाणी खरी ठरली

वाजपेयींचे मुंबईशी जुने नाते

मुंबई / प्रतिनिधी

‘भारत के पश्चिमी घाट को मंडित करनेवाले महासागर के किनारे खडे होकर मैं ये भविष्यवाणी करने का साहस करता हूं की अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा’…. अटलबिहारी वाजपेयी यांनी एप्रिल 1980 मध्ये मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या सभेतील अध्यक्षीय भाषणाची सांगता वरील ओळींनी केली होती. वाजपेयींची हे प्रेरणादायी बोल भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी शेवटपर्यंत संजीवनी देणारे ठरले. वाजपेयींची भविष्यवाणी महाराष्ट्रात तब्बल 34 वर्षांनी खरी ठरली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ‘कमळ’ फुलले आणि भाजपचा मुख्यमंत्री झाला. वाजपेयींच्या दुर्दम्य आशावादाचे गारूड आजही भाजपच्या कार्यकर्त्यांवर कायम आहे.

भाजपच्या स्थापनेनंतर पक्षाचे पहिले अधिवेशन एप्रिल 1980 मध्ये मुंबईत भरले होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात अटलबिहारी वाजपेयी यांनी ओघवत्या शैलीत भाजपचा राजकीय प्रवास कसा असेल याचे चित्र मांडले होते. त्याचवेळी त्यांनी देशात भाजपचा उदय होईल, अशी भविष्यवाणी वर्तवली होती. लोकसभेत पूर्ण बहुमत आणि देशातील 19 राज्यांमध्ये सत्ता असलेल्या भाजपसाठी वाजपेयींची भविष्यवाणी खरी ठरली आहे.

सुरुवातीला जनसंघ आणि त्यानंतर पक्षाच्या स्थापनेनंतर भाजपला देशात फार मोठे समर्थन नव्हते. 1980 च्या दशकात राजकीय पक्ष म्हणून भाजपची ताकद फार मर्यादीत होती. परंतु, अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या अमोघ वाणीने कार्यकर्त्यांना कायम प्रभावित केले. वाजपेयींचे बोल घेऊनच कार्यकर्त्यांनी गावागावात पक्षाला पोहचविण्याचे काम केले. मुंबईतील पहिल्या अधिवेशनातील अध्यक्षीय भाषणात बोलताना वाजपेयींनी आपली भूमिका स्वच्छपणे मांडली होती.

भाजपचे अध्यक्षपद हा काही दागिना नाही तर ती जबाबदारी आहे. पद हे प्रतिष्ठा नाही तर परीक्षा आहे. अध्यक्षपद हा सन्मान नाही तर आव्हान आहे. मला विश्वास आहे की आपल्या सहकार्याने आणि जनतेच्या पाठिंब्याने ही जबाबदारी आपण पार पाडू. पैसा आणि प्रतिष्ठेच्या मागे लागलेल्या व्यक्तीला आमच्याकडे स्थान नाही, असे वाजपेयींनी स्पष्ट केले होते.

अरबी समुद्रात कमळ फुलले

महाराष्ट्रात 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा 31 ऑक्टोबर 2014 रोजी शपथविधी झाला. या शपथविधीच्या निमित्ताने भाजपने वानखेडे स्टेडियमसमोरच्या समुद्रात कमळाच्या प्रतिकृती फुलवल्या होत्या. वाजपेयींची भविष्यवाणी खरी झाल्याचा आनंद तेव्हा प्रत्येक भाजप कार्यकर्त्याच्या चेहऱयावर दिसत होता.

मुंबईशी राजकीय ऋणानुबंध

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे मुंबईशी राजकीय ऋणानुबंध होते. शिवसेनेशी युती झाल्यानंतर हे ऋणानुबंध आणखी वाढले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युतीच्या प्रचाराचा नारळ वाजपेयी आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते फोडला जात होता. वाजपेयींनी मुंबईसह महाराष्ट्रात अनेक सभा गाजवल्या. गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, सोमय्या मैदानावरील वाजपेयींच्या मुंबईकरांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला होता.