|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » खेर्डीत प्रभातफेरीतच शिक्षकाचा मृत्यू

खेर्डीत प्रभातफेरीतच शिक्षकाचा मृत्यू 

चिपळूण / प्रतिनिधी

स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणानंतर काढण्यात आलेल्या प्रभात फेरीदरम्यान खेर्डी जि. प. उर्दूशाळेचे पदवीधर शिक्षक व उर्दू शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मोहिद्दीन गुलाब हुसेन मुल्लाजी (48) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. बुधवारी सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडली.

खेर्डी येथील जि. प. उर्दू शाळेत इंग्रजीचे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले मुल्लाजी बुधवारी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी त्यांनीच केली होती. ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसवेत घोषणा देत प्रभातफेरीने खेर्डी ग्रामपंचायतीकडे निघाले. खेर्डी ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वारावर त्यांना डोकेदुखीसारखे वाटू लागले.

यावेळी त्यांनी ग्रामस्थाकडे आपल्याला त्रास होत असून डोकेदुखीची गोळी मिळेल का, अशी विचारणा केली. मात्र सकाळच्या वेळेत बाजारपेठेतील मेडिकल बंद होती. त्यानंतर प्रकृती आणखीनच बिघडल्याने त्यांनी फॅमिली डॉक्टर अब्बास जबले यांच्याकडे नेण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांना तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले. मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर गोवळकोट रोड येथील कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहरातील गोवळकोट रोड-आझादनगर येथील रहिवाशी असलेले मुल्लाजी हे गेली चार वर्षे खेर्डी ऊर्दू शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्याआधी कान्हे शाळा व गुहागरमधील अंजनवेल येथेही त्यांनी काम पाहिले. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे मुल्लाजी हे आदर्श शिक्षक म्हणून परिचित होते. ते मूळचे कर्नाटकमधील विजापूरचे असून त्यांच्या पत्नी शमिना मुल्लाजी या मुरादपूर येथील हाजी एस. एस. वांगडे प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका म्हणून काम करतात. मुल्लाजी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.